कोकणचा हापूस आंब्याचा बापूस…!

कोकणचा हापूस आंब्याचा बापूस…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर

जगभरात आंब्याच्या विविध जाती विस्तारत असतानाही कोकणच्या हापूस आंब्याने आजही आपला रूबाब आणि नावलौकिक तितकाच आणि तसाच टिकून ठेवला आहे. कोकणातील हापूस आंब्यासोबत स्पर्धा करणाऱ्यांची कधीच कमी नव्हती. कोकणच्या हापूस आंब्यासोबत कोणी स्पर्धा करू शकत नाही. याचं कारण कोकणचा हापूस आंब्याचं पिवळेधम्म असणार सौंदर्य आणि त्याचा स्वादिष्टपणा त्याबाबतीत कोणी जवळपासही पोहचूच शकत नाही…

प्राथमिक शाळेत शिकत असताना जंगलचा राजा कोण, फळांचा राजा कोण, पक्षांचा राजा कोण ? असले प्रश्न पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमाला असायचे. सहजतेने फळांचा राजा आंबा हे उत्तर ऐकताना लिहिताना त्या शालेय जीवनातही अभिमान वाटून जायचा. याच प्रमुख कारण फळांचा राजा म्हणून आपल्या कोकणचा हापूस आंबा म्हटला जायचा. आंबा हा फळांचा राजा म्हणून त्याची ओळख निर्माण झाली असली तरीही कोकणचा हापूस आंबा हा संपूर्ण आंब्यांच्या जमातीत कसा ज्येष्ठ, श्रेष्ठ आहे हे खरंतर वेगळ सांगण्याची आवश्यकताच उरत नाही. कोकणच्या देवगड आणि रत्नागिरी हापूसची एक जगभरात एक वेगळी ओळख आणि नावलौकीकही आहे. इंग्लडच्या राजघराण्यात कोकणच्या हापूस आंब्याला मानाच पान आहे. आजही जगभरात आंब्याच्या विविध जाती विस्तारत असतानाही कोकणच्या हापूस आंब्याने आजही आपला रूबाब आणि नावलौकिक तितकाच आणि तसाच टिकून ठेवला आहे. कोकणातील हापूस आंब्यासोबत स्पर्धा करणाऱ्यांची कधीच कमी नव्हती. कोकणच्या हापूस आंब्यासोबत कोणी स्पर्धा करू शकत नाही. याचं कारण कोकणचा हापूस आंब्याचं पिवळेधम्म असणार सौंदर्य आणि त्याचा स्वादिष्टपणा त्याबाबतीत कोणी जवळपासही पोहचूच शकत नाही. कोकणातील हापूस आंब्याला इतर भागातील आंब्यांपेक्षा अधिकचा चांगला दर मिळतो. परंतु दुर्दैवाने काही आंबा व्यावसायिकांनी काही गोष्टी गांभिर्याने पाळल्या नाहीत यामुळे सहाजिकच आपल्या कोकणच्या हापूसला बदनामीलाही सामोरे जावे लागत आहे. कोकणच्या हापूसला यापूर्वीच जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. कोकणचा हा हापूस आंबा हा केवळ कोकणच्याच नव्हेतर महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने कोकणच्या हापूस आंब्याच्याबाबतीत यापूर्वीही स्पष्ट केले आहे. कोकणच्या हापूसला यापूर्वी मानांकन प्राप्त झालेले असल्याने हापूस आंब्यासाठी मानांकन मागणी करणे केवळ आक्षेपार्हच नव्हे तर पूर्णपणे चूकीचेच आहे. त्यामुळे गुजरातच्या बलसाड आंब्याला हापूस आंबा म्हणून जे मानांकन मागितले जात आहे. त्याला कोकण कृषी विद्यापिठानेही आक्षेप घेतला आहे. कोकणच्या हापूस आंब्याला गेल्या अनेक वर्षांपासून एक लौकिक प्राप्त झालेला आहे. तो केवळ आंबा या प्रजातीमध्ये त्याच्यातल्या राजेपणा बरोबरच देखण्या स्वादालाही कारणीभूत आहे. कोकणच्या हापूसची बरोबरी कुणालाच करता येणार नाही. परंतु दुर्दैवाने कोकणच्या हापूसला बदनाम करण्यासाठी सर्व बाजूने घेरले जात आहे.
कर्नाटक राज्यातील आंबा कोकणात आणि पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरच्या बाजारात उतरवला जात आहे. कोकणच्या हमरस्त्यांवर कोकणचा हापूस म्हणून आंध्रप्रदेशामधील महिला आंबा विक्री करताना दिसतात. दुर्दैवाने हे कोकणातील हमरस्त्यांवर हे राजरोस दिसत असतानाही कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी संघटीतपणे यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असतानाही यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाहीत. मुळात कोकणातील शेतकरी, बागायतदार संघटीत नाहीत. एखाद्या विचाराने प्रेरित होऊन काही करतील अशी स्थिती नाही. यामुळेच कोकणात येऊन कोकणचा हापूस आंबा म्हणून कोणत्याही भागातील आंबा आणून त्याची विक्री केली जाते. कोकणचा हा हापूस आंबा पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये तयार होतो. कोकणच्या किनारपट्टीवरील भागात तयार होणारा हापूस आंबा हा अधिक स्वादिष्ट असल्याचे मानले जाते.
गुजरातचा बलसाड आंबा मे महिन्याच्या अखेरीस तयार होतो आणि सर्वसाधारणपणे पाऊस असतानाही हा बलसाड आंबा बाजारात असतो. गेल्याकाही वर्षात पावसाळयातही आंबे बाजारात दिसतात. या पावसाळयात येणाऱ्या आंब्याला कोणतीही टेस्ट नसते. परंतु कोकणच्या हापूस आंब्याचा मात्र एक ठराविकच कालावधी आहे. त्याच कालावधीत हापूस आंबा पिकतो, तयार होतो. आणि विकलाही जातो. त्यामुळे कोकणचा हा हापूस आंबा सर्व आंब्यांचाच ‘बापूस’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.