रत्नागिरीत वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन

रत्नागिरी : राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त रत्नागिरीत निसर्ग सोबती या क्लबची स्थापना करण्यात आली. लेन्स आर्ट आणि सह्याद्री संकल्प सोसायटी या दोन संस्थांनी मिळून वन्यजीव सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचा प्रारंभ करण्यात आला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात निसर्ग सोबतीची स्थापना, व्याख्याने यांचा यात समावेश होता.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, प्रमुख पाहुण्या म्हणून परीविक्षाधीन आयएएस अधिकारी.डॉ. जस्मिन, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, वनाधिकारी एन. एस. गावडे, मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, सचिन कारेकर, निसर्गयात्री संस्थेचे प्रमुख भाई रिसबूड उपस्थित होते. निसर्ग सोबती क्लबच्या लोगोचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की, निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून व परस्परांशी जोडलेला आहे. त्यातील माणूस हा एक घटक असल्याने निसर्ग संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. लेन्स आर्ट, निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटी या तिन्ही संस्थांनी एकत्रित काम करावे. जिल्हा परिषदेकडून लागणारे सर्व सहकार्य देऊ.

डॉ. जस्मिन म्हणाल्या की, निसर्ग सोबती व अन्य संस्थांनी एकत्र येऊन काम करावे. निसर्ग संवर्धनात ही छोटी पण महत्त्वाची भूमिका असून याचा पुढच्या पिढीला उपयोग होईल, असा आशावाद वाटतो.

निसर्गसोबती क्लबच्या संस्थापिका निखिता शिंदे यांनी सांगितले की, लेन्स आर्टच्या सिद्धेश वैद्य, नेत्रा आपटे, विवेक सोहनी व प्रतीक मोरे यांच्या सक्रिय पाठबळामुळे आज निसर्गसोबती उपक्रम सुरू केला आहे. सर्वांनी एकत्र मिळून काम केले तर जास्त प्रभावशाली ठरेल, या हेतूने निसर्ग सोबती क्लब सुरू केलाय.

सिद्धेश वैद्य म्हणाले की, २०१५ पासून लेन्स आर्ट फोटोग्राफी क्षेत्रात कार्यरत आहे. आतापर्यंत वारीची ५-६ प्रदर्शने झाली. यंदा वारीच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातील सर्व फोटो पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच विकत घेतले आहेत. यामुळे लेन्स आर्टच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे. आता संस्था पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार आहे.

सह्याद्री संकल्प प्रतिष्ठानचे खजिनदार कुणाल अणेराव यांनी सांगितले की, आम्ही गेल्या तीन वर्षांपासून देवरुखमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी काम करत असून रिसर्च बेस ऑर्गनायझेशन आहे. कोविड काळात ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे निसर्गभान नावाची व्याख्यानमाला सुरू केली. 48 व्याख्यानांतून साधारण 5000 लोकांपर्यंत पोहोचलो. धनेश पक्षी संवर्धन, सडा संवर्धनाचे काम सुरू आहे. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी निसर्गसोबती उपक्रमाचे कौतुक केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ३६ क्लब कार्यरत असून पर्यावरण संवर्धनासाठी आपण एकत्रित काम करूया. शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूया.

या प्रसंगी विशाल भावे यांनी समुद्रातील जैवविविधता या विषयावर भाषण दिले. पर्यावरण अभ्यासक अक्षय मांडवकर यांनी स्पिशिज हॅबिटाट ट्रस्टबरोबर डॉल्फिन आणि कोकण दिपकाडी यावर तयार केलेले दोन व्हिडीओ दाखवण्यात आले. त्यानंतर मांडवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात प्रतीक मोरे यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील जैवविविधता या विषयावर भाषण झाले. याप्रसंगी निबंध कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. नेत्रा आपटे यांनी आभार मानले.