रविवारपासून अध्यात्म मंदिरात व्याख्यानमाला
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस) अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमाला येत्या दि. १५ ते १७ ऑक्टोबरपर्यंत आयोजित केली आहे. यानिमित्त स्वरूप योगिनी पुरस्कारही देण्यात येणार आहेत. यंदा सौ. शैलजा बेहेरे, सौ. अर्चना बक्षी आणि सौ. शमिन शेरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
व्याख्यात्या सौ. अंजली बर्वे यांचे व्याख्यान दररोज सायंकाळी ५.४५ ते ७.१५ या वेळेत होईल. या वेळी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्ष शिल्पा पटवर्धन, कार्याध्यक्ष जयंत देसाई आणि कार्यवाह हृषिकेश पटवर्धन उपस्थित राहणार आहेत. रविवारी या देवी सर्वभुतेषु शांती रूपेण संस्थिता (शांतीरूप स्वामी स्वरूपानंद चरित्र), १६ ला शांती रसाची खाण ज्ञानेश्वरी (भाग १) आणि १७ ला याच व्याख्यानाचा दुसरा भाग यावर सौ. बर्वे बोलणार आहेत. व्याख्यात्या प्रा. सौ. अंजली दीपक बर्वे या डीबीजे ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यक्तींवर १४ पुस्तके प्रकाशित आहेत. त्या को.म.सा.प. आणि म.सा.प. चिपळूण शाखा कार्याध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या संचालिका म्हणून काम केले आहे. प्रवचने, दै. सकाळमध्ये संस्कृती विषयक सदर लेखन केले आहे.
व्याख्यात्या प्रा. सौ. अंजली दीपक बर्वे. एम.ए.बी.इडी., डीबीजे जुनियर कॉलेज येथे 13 वर्षे मराठी विषयाचे अध्यापन. शालेय विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यक्तींवर सुकृत प्रकाशनतर्फे 14 पुस्तके प्रकाशित. समर्थ विद्यापीठाच्या दासबोध अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक परीक्षक. भूषविलेली पदे : को.म.सा.प. आणि म.सा.प. चिपळूण शाखा कार्याध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय,चिपळूण संचालक, नाशिक अखिल भारतीय साहित्य संमेलनाला निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग. विविध विषयांवर विविध ठिकाणी लेखन, वक्तृत्व, प्रवचन आकाशवाणीसाठी लेखन. सकाळ वृत्तपत्रात संस्कृती विषयक सदर लेखन, सागर वृत्तपत्रात ‘गाथा पुरुषोत्तमाची’ ही 60 दिवसांची लेखमाला या श्रावण महिन्यात प्रसिद्ध झाली आहे.
*पुरस्कारप्राप्त स्त्रियांची माहिती*
कुर्धे येथील प्रगतीशील शेतकरी सौ. शैलजा सुधाकर बेहरे- लग्नापर्यंत शहरात आणि लग्नानंतर खेड्यात असा यांचा उलटा प्रवास..माणसांवर देखरेख करण्याच्या निमित्ताने शेतात प्रवेश आणि मग शेती हेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. शेतीतील औपचारिक शिक्षणाचा अभाव वाचनाने भरून काढला, गांडूळ खताची व्यावसायिक तत्वावर निर्मिती केली. सेंद्रीय खताची धनसम्पदा या ब्रँडने निर्मिती केली. काळानुसार फळ बाग लागवड, वानरांपासून बचावासाठी सोलर कुंपणाचा यशस्वी प्रयोग असे सतत नवे नवे प्रयोग यांनी केले. सध्या आंब्याबरोबरच चिकू, पेरू, अननस, पपई, नारळ व ड्रॅगनफ्रूट अशा फळांचे उत्पादन घेत आहेत. त्यांना शेतीसंदर्भातील शासनाचे तसेच इतर पुरस्कारही मिळालेले आहेत.
सौ. अर्चना सुनील बक्षी- एम.कॉम.एम.फीलपर्यंत शिक्षण. पूर्वाश्रमीच्या कमलिनी श्रीकृष्ण देशमुख, मूळच्या मेहेकर, बुलढाणा विदर्भातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या. गेली 6 वर्षे चिपळुणच्या डीबीजे कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम करत आहेत. विशेष म्हणजे गेली 21 वर्षे शिक्षण प्रसारक मंडळी पुणे यांच्या एमएससीसीआर या संस्थेच्या समन्वयक म्हणून काम करत आहेत. अखिल भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या ‘भारतीय स्त्री शक्ती’ पुरस्कारप्राप्त अशा अर्चनाताईंना चिपळूणच्या प्रसिध्द लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा आदर्श वाचक पुरस्कार मिळाला आहे. 2021च्या पुराच्या वेळी 1300 महिलांना कपडे वाटप, 60 पुरग्रस्त विद्यार्थीनींना सुकन्या निधी योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. 3 बचतगटांना घरघंटी, 3 बचत गटांना पापड प्रेस मशीन दिली. यांना चतुरस्त्र समाजसेविका असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सौ. शमिन शाश्वत शेरे- विशेष मुलांसाठी शिक्षण देण्याची गरज ओळखून 1986 मध्ये आविष्कार या संस्थेच्या स्थापनेत संस्थापक सदस्य म्हणून त्यांचा सहभाग आहे. आविष्कारच्या विशेष मुलांच्या शाळेच्या त्या पहिल्या मुख्याध्यापक आहेत. त्यांनी मुख्याध्यापक या नात्याने या शाळेची आखणी, उभारणी आणि प्रगती केली. विशेष मुलांच्या शिक्षणासाठी निसर्गायन या पद्धतीचे संशोधन आणि अभ्यासक्रम यात त्यांचा सहभाग आहे. त्यांनी वृत्तपत्रे, मासिके, चर्चासत्रे व आकाशवाणी याद्वारे मतिमंदत्व या विषयावर लेखन व भाषणे केली आहेत. निवृत्ती नंतरही विशेष मुलांसाठी कार्यरत आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये सर्व प्रकारच्या अपंगांच्या व्यावसायिक पुनर्वसनासाठी अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्या मतिमंदत्व असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी समान अभ्यासक्रम तयार करणाऱ्या शासकीय समितीच्या सदस्य आहेत.











