शहरात पुन्हा मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला

 

न. प. प्रशासनाने बंदोबस्त करावा माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे यांची मागणी

मुख्याधिकारी प्रशांत भोसलेंची घेतली भेट

राजापूर l प्रतिनिधी: शहरात पुन्हा एकदा ऐन नवरात्र उत्सवात मोकाट कुत्र्यांची दहशद निर्माण झाली आहे. शहरात जवाहर चौक, बाजारपेठ परिसरासह अन्य भागात मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

याबाबत मंगळवारी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे यांनी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेऊन नगर परिषद प्रशासनाने यावर तातडीने काहीतरी उपायोजना करावी, या मोकाट कुत्र्यांची नसबंदी करावी अशी मागणी केली. यावर लवकरच कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.

यापुर्वीही राजापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला होता. त्यावेळी न. प. प्रशासनाच्या वतीने या मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीबाबत निवीदा प्रक्रिया करून नसबंदीचा ठेका देण्यात आला होता. त्यानंतर संबधित ठेकेदार कंपनीने कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली होती.

मात्र आता पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा उपद्रव शहरात वाढला आहे. शहरात जवाहर चौक, बाजारपेठ, शिवाजीपथ, वरचीपेठ, एसटीडेपो, यांसह अन्य भागात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडीच्या झुंडी फिरत आहेत, त्यामुळे महिला, शाळकरी विद्यार्थी, वृध्द यांच्यात भितीचे वातावरण आहे. तर सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने रात्री उत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असून यात महिलावर्गाचाही समावेश आहे. त्यामुळे रात्री देखील ही मोकाट कुत्री रस्त्यावर झुंडीने फिरत आहेत.

याबाबत मंगळवारी खलिफे यांसह वरचीपेठ येथील नागरिक सदाशिव तांबट यांनी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेतली व यावर चर्चा करत या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.

यावर शहरात मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा नसबंदीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. संबधित यंत्रणेशीही संपर्क साधण्यात आला असून याबाबत निश्चितच कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.