गोवा (क्रीडा प्रतिनिधी) – गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत महाराष्ट्रच्या महिला खो खो संघाने सहजरित्या उपांत्य फेरी प्रवेश केला. उद्या होणाऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र महिला संघाची उपांत्य फेरीत कर्नाटकशी गाठ पडणार आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र पुरुष संघाने अ गटातील तिनही सामन्यात सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला.
येथील फोंडा मल्टीपर्पज मैदानावर सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गटातील तीनही सामने जिंकत महाराष्ट्र महिला संघाने गटात अव्वल स्थान कायम राखले. ब गटात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या कर्नाटक बरोबर महाराष्ट्रची उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे.
आज झालेल्या गटातील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा ४८-२४ असा २४ गुणांनी पराभव करत गटात प्रथामस्थान राखले. महाराष्ट्र संघाकडून प्रियांका भोपिने ३.४० मी. संरक्षण आणि १ गडी बाद केला. पूजा फरगडेने आक्रमणाची चमक दाखवत ५ बळी टिपले. किरण शिंदेने २.३० मी. संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. संपदा मोरेने २.०० मी. संरक्षण करत गुजरातचे ३ संरक्षक बाद केले. गुजरात संघाकडून किरण १.२० मी. आणि १.१० मी. संरक्षण केले. तर ओपिनने१.३०, १.२० मी. संरक्षण करत १ गडी बाद केला.
महिला गटात महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आणि ब गटात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या ओडीसाचा अ गटात दुसऱ्या क्रमांकावरील केरळ बरोबर उपांत्य फेरीचे सामने होणार आहे. आज झालेल्या महिला गटातील अन्य सामन्यात कर्नाटकने हरियाणाचा ५२-४० असा २२ गुणांनी तर केरळने गोव्याचा १२०-१२ असा १०८ गुणांनी पराभव केला.
महाराष्ट्राने गटातील अंतिम सामन्यात आंध्रप्रदेशवर ७४-३२ असा ४२ गुणांनी सहज मिळवला असला तरी सामन्याला प्रारंभ जोशात झाला . प्रथम आक्रमण करणाऱ्या आंध्रप्रदेशने ८ गडी बाद करण्यात यश मिळवले. यामुळे सामना चुरशीचा होईल असे वाटत होते. मात्र महाराष्ट्रने धारदार आक्रमण करीत आंध्रचे १३ गडी बाद केले आणि सामना एकतर्फी आपल्या बाजूला केला.
फैजन पठाणने १.१० मी. संरक्षण करत ८ गडी बाद केले त्याला साथ देत रामजी कश्यपने १.१०, १.०५ मी. संरक्षण करताना ६ संरक्षक टिपले. ऋषिकेश मुरचवडेने ४ बळी मिळवले. अक्षय मासाळने १.२० संरक्षण करताना ३ गडी बाद केले.










