‘प्रहार’च्या दिवाळी अंक झेप मध्ये काही वर्षांपूर्वी आलेला लेख
रत्नागिरी l अनघा निकम – मगदूम :एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करून एखादा माणूस जितके कमवेल तितके पैसे शेती करून मिळवायचे असा ध्यास घेतलेल्या आणि ३१ वर्षांच्या मेहनतीनंतर जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्यातील कृषीक्षेत्रामध्ये एक विश्वसनीय ब्रॅन्ड तयार करण्यात यशस्वी झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील रिळ येथील मिलिंद दिनकर वैद्य यांची ‘यशोगाथा’ सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीकडे न वळता घरातील पारंपरिक शेतीकडे वळलेल्या मिलिंद वैद्य यांनी आजी, आजोबांनी रूजवलेल्या शेतीच्या पध्दतीमध्ये बदल करण्यास सुरवात केली. यासाठी त्यांनी स्वत:ला अपडेट ठेवण्यास सुरूवात केली.
घेतलेल्या शिक्षणाचा शेती आणि जोड व्यवसायाच्या विकासासाठी त्यांनी उपयोग केला. कृषी क्षेत्राशी निगडीत विविध मासिके, पुस्तके सातत्याने वाचून त्यातुन नव काही शिकण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे रिळ सारख्या शहरापासून दूर असलेल्या गावात राहूनही ते कृषी विषयाबाबत अन्य लोकांपेक्षा अधिक ज्ञानी आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या गावात मोबाईलची रेंज नाही. त्यामुळे माणसांशी संपर्क जोडण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरणारा सोशल मिडिया त्यांच्याकडे नाही. तरीही ते सर्वांशी ‘कनेक्टेड’ आहेत ते त्यांच्या माणसे जोडण्याच्या कलेमुळे. त्याचा उपयोग त्यांच्याच क्षेत्रातील विविध माणसे जोडण्यासाठी त्यांनी केलाच परंतु शेतीवर कायमस्वरूपी कामगार ठेवतानाही केला. कृषी क्षेत्र हे एक अॅग्रो इंडस्ट्री झाली पाहिजे असा विचार सतत त्यांच्या डोक्यात सुरू असतो. त्याची सुरूवात स्वत:पासून करतानाच त्यांनी शेतीमध्ये पैरीवर माणसे न नेमता महिना वेतनावर कामगार नेमले. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होतानाच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य करायला सुरूवात केल्याने मिलिंद वैद्य यांना माणसे न मिळण्याची समस्या कधीच जाणवली नाही. ही मिलिंद वैद्य यांची एक आगळीच कल्पना होती.
असेच सातत्याने शेतीमध्ये नवनवे प्रयोग करायचे आणि त्यातून आदर्श शेतीकडे वाटचाल करायची हे मिलिंद वैद्य यांचे ध्येयच आहे. ते सतत कृषी क्षेत्रात घडणारं नवं ते शोधत असतात. त्याचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करीत असतात. प्रत्येक गोष्टीचा उपयोग झालाच पाहिजे असे मनाशी ठरवून त्याप्रमाणे नियोजन करीत असतात. सर्वच प्रकारचे नियोजन असले की यश मिळणं फार सोपं होतं असा त्यांच्या यशाचा फंडा आहे. त्यामुळेच भातशेतीतली नवनव्या जाती त्यांच्या शेतात पिकतात. १० पैशाच्या बीपासून १००० रूपयांचा फायदा देणाºया भोपळ्यापासून अनेक किफायशीर भाजीपाला त्यांच्याकडे तयार होतो. त्याची उत्तम प्रकारे विक्री होते. केवळ कृषीच नव्हे तर त्यासोबत पुरक व्यवसायही ते करतात.
दुग्धव्यवसायातून केवळ दुधच नव्हे तर उत्तरप्रकारचे दही, तूप यांची ते विक्री करतात. विशेष म्हणजे गेल्या ३० वर्षात त्यांनी एकही जनावर बाहेरून विकत घेतलेले नाही. नारळासह नारळाच्या झाडापासून झाऊळ, खोड, सोडणं, सुंभ, झाडू, झाप अशा गोष्टी ते तयार करतात. शेताभोवती रोवलेल्या गुलाबांचाही उपयोग करताना त्यांची दूरदृष्टी असून केवळ सुवासासाठी, सजावटीसाठी किंवा पुजेसाठीच गुलाब न वापरता वाळलेल्या गुलाबापासून उत्कृष्ट प्रकारचे गुलकंदही श्री. वैद्य बनवितात. एकीकडे शेती, पशुपालन आणि पुरक व्यवसाय करीत असतानाच त्यांच्या बागेत पिकणारा रसाळ आंबाही श्री. वैद्य यांच्या मेहनतीची चव दरवर्षी देत असतोच. त्यालाही दरवर्षी चांगलीच मागणी असते.
केवळ उत्पादन नव्हे तर बाजारपेठेसाठीही त्यांनी योग्य ते नियोजन केले असून मुंबई, पुणे पासून वाशी बाजारातही वैद्यांचा तांदूळ आणि आंबा पेटी पोहोचते. मुंबईमध्ये त्यांचा हा व्यवसाय रुजविण्यासाठी त्याना त्यांचा भाऊ रविंद्र हे मदत करतात. पुणे येथून त्यांचे सासु- सासरेही त्यांना मदत करतात. इतक्या वर्षांच्या व्यवसायात त्यांनी ग्राहक बांधून ठेवले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल केवळ जिल्ह्यानेच नव्हे तर राज्यानेही घेतली असून आदर्श शेतकरी म्हणून जिल्हास्तरावर त्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कार पटकाविला आहे. तर भातपीक स्पर्धेत त्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या सर्वांमध्ये त्यांना मदत करणाºया जिल्हा परिषदेचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, राजेश सपकाळे आणि परेश सुर्वे या अधिकाºयांना तर ते ‘ब्रह्मा विष्णू महेश’ असेच संबोधतात. या तिघांकडूनही शेतीबाबत केव्हाही मार्गदर्शन मागितले तरीही ते तात्काळ दिले जाते असे मिलिंद वैद्य आवर्जुन सांगतात. यंदाच त्यांनी सगुणा पध्दतीची भातलागवड करून १९.२४ टन विक्रमी पीक घेतले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीचा भात उत्पादनाचा जागतिक विक्रम चीन मधील शेतकºयाच्या नावावर असून तो १९.४० टनाचा आहे. यावरूनच मिलिंद वैद्य यांच्या शेती व्यवसायाचा आवाका लक्षात येतो. मात्र व्यवसाय ‘सेट’ झाला म्हणून श्री. वैद्य यांना थांबायचे नाहीय.
तर विषमुक्त शेती करण्यासाठी त्यांची धडपड आहे. आॅरगॅनिक शेतीकडे त्यांचा अधिक कल आहे. त्याशिवाय रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाणाºया तरूणांना कृषी क्षेत्रात आकर्षित करायचे आहे. नोकरीसाठी बाहेर जाऊन न धडपडता तरूणांनी इथेच या मातीसाठी कष्ट करावे, ती सोनेच पिकवते असे ते सांगतात.
त्याशिवाय एक ब्रॅन्ड निर्माण करण्याची त्यांची धडपड आहे. यासाठी त्यांना त्यांचा अभ्यास, नवनवीन तंत्रज्ञाने मदत करतातच परंतु आई, पत्नी यांचीही मोलाची साथ आहे. त्यामुळेच यशाच्या वाटेवर मिलिंद वैद्य यांची वाटचाल जोमाने सुरू आहे असेच म्हणावे लागेलच परंतु वेगळी वाट शोधणाºयांसाठीही ती प्रेरणादायीच आहे हेही तितकेच खरे.












