लोकप्रतिनिधी व एस.टी. प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची पर्यटक- प्रवाशांची आग्रही मागणी–
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : सध्या फोंडाघाट मार्गे बहुतांशी वाहतूक सुरू असल्याने एस.टी. स्थानकावर गर्दी असते. वाहन चालक- पर्यटक- महिला अबालवृद्ध यांची वर्दळ असते. मात्र सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील एस.टी. स्थानकावरील सुविधांकडे एस.टी. प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने प्रवासी -पर्यटकांकडून खेद व्यक्त होत आहे. याबाबतची संपूर्ण कल्पना एस.टी. प्रशासनाचे जिल्हा अधीक्षक यांना आठ दिवसापूर्वी देण्यात येऊनही, अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
एस.टी स्थानक मधील विहिरीला हजारो रुपये खर्च करून नवीन विद्युत पंप बसविण्यात आला. मात्र विहिरीतील गाळ – कचरा -पाणी उपसा न केल्याने, सदर विहिरीचे पाणी दूषित, वापरण्या.योग्य नाही .एस.टी गाड्या स्थानकात येतात, त्या ठिकाणी भला मोठा खड्डा असून, कसरत करत चालकांना, गाड्यांना हेलखावे देत व प्रवाशांना आपटत यावे लागते. यावेळी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. स्वच्छतागृहाची अवस्था तर, पाणी नाही, नळांना कॉक नाही, बादली नाही अशी आहे. त्यामुळे स्वच्छतागृह गरजू होतकरू व्यक्तीकडे पे अँड युज साठी देण्याची मागणी पुढे येत आहे .स्थानकामध्ये देण्यात आलेली दुकान गाळे नियोजन न करता दिल्याने, तसेच रिक्षा स्टॅन्ड असूनही, रिक्षा आणि पार्किंग गाड्या कशाही लावल्या जात असल्याने,त्याचा त्रास एस.टीच्या चालकांना सहन करावा लागतो. स्थानकातील कॅन्टीन कित्येक वर्ष बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना पळत पळत रस्त्यावरील टपऱ्या- खोक्यांचा आधार घ्यावा लागतो. पेपर-स्टेशनरी स्टॉल अनियमित खुले असतात.दुपारी १२:४० ते संध्याकाळी ४ पर्यंत, कणकवली जाणारी लोकल बस नाही.त्यामुळे एस.टीची वाटचाल खाजगीकरणाकडे आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. बऱ्याच लांब रूट च्या गाड्या वैभववाडी मार्गे वळविल्या आहेत. त्या पूर्ववत फोंडा स्थानकावरून पुढे जाव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
या सुविधांना स्थानकावरील कंट्रोलर यांना सामोरे जावे लागते. वादविवाद होतात. या सर्व बाबींची एस.टी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पर्यटन जिल्ह्याचे प्रवेशद्वारावरील स्थानक, सुविधांनी युक्त- सुसज्ज करावे अशी आग्रही मागणी होत आहे——












