कणकवली : कोकण रेल्वेतर्फे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर सातत्याने कारवाईसत्र गेल्या काही काळापासून राबविण्यात येत आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यामध्ये २१ हजार १६३ प्रवासी विनातिकीट आढळले. या सर्वांवर मिळून २ कोटी ९२ लाख २० हजार २६६ एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच जास्त होते. याचा त्रास प्रामाणिक प्रवाशांना होतोच. शिवाय रेल्वेचे उत्पन्नही बुडते.
याच कारणास्तव कोकण रेल्वेतर्फे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु करण्यात आला. ही मोहीम आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ४ हजार ४८४ प्रवासी विनातिकीट आढळले, त्यांच्याकडून २६ लाख ६७ हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला. सप्टेंबर महिन्यामध्ये ४ हजार ८८८ प्रवासी विनातिकीट आढळले, त्यांच्याकडून २७ लाख ९ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यामध्ये ४ हजार ७७८ प्रवासी विनातिकीट आढळले, त्यांच्याकडून ३२ लाख ६० हजार ५६ रुपये दंड वसूल करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये ७ हजार १३ प्रवासी विनातिकिट आढळले. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपये एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी योग्य आणि वैध तिकिटासह प्रवास करावा. कारण यापुढेही संपूर्ण को. रे. मार्गावर तिकीट तपासणी मोहीम सुरु राहणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती सचिन देसाई यांनी दिली आहे.











