बेनगी, शेडेकरवाडी परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये आंबा आणि काजूची झाडे जळून खाक

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील बेनगी, शेडेकरवाडी परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये आंबा आणि काजूची झाडे जळून खाक झाली असून बागायतदार शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. बागांमधून गेलेल्या वीजवाहीन्यांचे स्पार्कींग झाल्याने वणवा लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान शिवसेना (शिंदेगट) तालुकाध्यक्ष दिपक नागले यांनी नुकसान झालेल्या बागांची पाहणी केली असून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.

कोकणामध्ये असणाऱ्या डोंगरमय जगलांना गेल्या काही वर्षामध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढले असून मोठ-मोठी जंगले, आंबा-काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. त्यामुळे शेतकरी बागायतदारांना त्याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी शहरालगतच्या शीळ परिसरात वणवा लागलेला असताना आता बेनगी आणि शेडेकरवाडी परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये मोठ्या पमाणात आंबा व काजू बागातींचे नुकसान झाले आहे.

यामध्ये शेडेकरवाडीतील वासंती वारीशे, प्रकाश पावणाक, गीता शेडेकर, सूर्या पावणाक, संतोष पावणाक, साधना वारीशे, दिपक शेडेकर, राधिका वारीक, अनिता शेडेकर, पार्वती शेडेकर, रामचंद्र शेडेकर, द्रौपदी शेडेकर, गणपत शेडेकर व बापू पावणाक तर बेनगी येथील सुहास नागले व यशवंत नागले यांच्या बागेतील आंबा व काजूची कलमे जळून लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. बागेतून गेलेल्या वीज वाहीन्यांचे स्पार्कींग होवून सदरची आग लागल्याचे शेतकऱयांनी सांगितले. या नुकसानीचा तलाठ्यांमार्फत पंचनामा करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेनंतर शिवसेना तालुकाध्यक्ष श्री.नागले यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नागले यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे.