सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस खूप पडतो आणि तेच कोकण निसर्गरम्य असण्याचे गमक आहे. पण अशा जिल्ह्यातील रेडी गावात शेकडो फूट खोदाई होणारे मायनींग आणि त्यामुळे हवेत पसरणाऱ्या कणांचा अवशेष पाण्याचे स्रोतात सापडतो आणि त्यामुळे उदभवणारी रोगराई आणि आजार यांपासून रेडी गावाला मुक्तता मिळावी यासाठी नॅब समृद्धी फायनान्स या कंपनीच्या सहकार्याने कोकण संस्थेने वॉटर प्लॅन्टचे लोकार्पण करण्यात आले. यापूर्वीच संस्थेच्या माध्यमातून रेडी गावात संस्थेच्या माध्यमातून वॉटर एटीएम देण्यात आले आहे.
हुडावाडी रेडी येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन श्रीमती सिंड्रेला जोसेफ आणि हर्षला अमूप यांनी फित कापून केले यावेळी माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ,श्री मंगेश कामत ( माजी पंचायत समिती सदस्य.रेडी) रामसिंग राणे – सरपंच, रेडी ग्रामपंचायत, सौ.नमिता नागोळकर – उपसरपंच रेडी कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, संस्थेचे प्रथमेश सावंत, सुरज कदम, प्रीती पांगे आणि साक्षी पोटे उपस्थित होते.
दुष्काळी भागात जेवढा पाण्याचा बिकट प्रश्न असतो तसा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात असू शकत नाही अशी धारणा जन माणसांची असते आणि ती तत्त्वतः खरी आहे. पण कोकणातील काही गावात पाण्याची आजही समस्या आहे आणि ती म्हणजे शुद्ध पाण्याची.
या पाश्वभूमीवर गावा ला स्वच्छ पाणी मिळवून देण्यासाठी नॅब समृद्धी फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपल्या सी एस आर निधीतून या गावात वॉटर एटीएम आणि पाणी स्वच्छता सयंत्र देऊन मदतीचा हात दिला. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेडी गाव आणि विभागातील २० हजाराहून अधिक लोकांना याचा लाभ होणार असून लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कोकण संस्थेचे अवंती गवस, समीर शिर्के, भावना साटम, प्रदीप पवार, हनुमंत गवस, शशिकांत कासले, बाळकृष्ण शेळके, कुणाल चव्हाण यांनी मदत केली.यावेळी आजी – माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथमेश सावंत यांनी तर आभार प्रितेश राऊळ यांनी मानले.












