कामांत मोठा गैरप्रकार- केंद्रीय मंत्रालय व सचिव, आयुक्तांकडे तक्रार – उदय बोरकर
खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील भरणे जि.प. गटातील जल जीवन मिशन योजनेतील कामे निकृष्ट व नियमबाहय पध्दतीने करुन कोटयावधीच्या रकमेच्या प्रत्येक योजनेत मोठा गैरप्रकार होत असून यामध्ये अधिकारी व उप अभियंता यांचे सहकार्य होत असल्याचा संशय आहे असा आरोप भाजपा नेते व बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर यांनी केला आहे. आमदारांनीही मंडणगड तालुक्यातील कामांवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे जल जीवन मिशन योजनेतील कामांची चौकशी होणे गरजेचे आहे.
योजनेबाबत अधिकारी व अभियंता यांनी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन निर्णय क्रमांक : जजमि२०१९/प्र.क्र.१३८/पापु-१०( ०७) दिनांक ०४ सप्टेंबर, २०२० व भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या निर्देशांची नीट माहीती न देता अंधारात ठेवले आहे. ५ टक्के लोकवगर्णीची अट असतांना व विहीरी, पाण्याची टाकी व ज्याचे जागेतून पाईपलाईन जात असते अशांचे बक्षिसपत्र सक्तीचे असतांना याबाबत ग्रामस्थांना योग्य माहीती दिली गेली नाही. लोकवगर्णी भरली नाही तरी कामे सुरू करता येतात असे जि.प. पाणीपुरवठा खेड उप विभागाचे उप अभियंता श्री. बुटाला यांनी सांगितल्याची माहीती चिंचवली, बोरघर इत्यादी गावातील ग्रामस्थ देत आहेत. त्यामुळे लोकवर्गणी जमा झालेली नसतांना व बक्षिसपत्रे झालेली नसतांना कामे सुरू करण्यात आलेली आहेत.
उप अभियंता हे सरपंच व ग्रामस्थांना सांगत आहेत की, आम्हाला प्रांत अधिकारी यांनी सांगितले आहे की बक्षिसपत्रे व्हायला वेळ लागणार असल्याने संमतीपत्रावर कामे सुरू करा. ही गोष्ट गंभीर असून अधिकारी व अभियंता जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून योजनांचे गैरप्रकारात सहकार्य करत आहेत. पाणी पुरवठा विभागाकडून कार्यालयाकडून प्रमाणित अंदाजपत्रकही अद्याप ग्रामपंचायतीना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामीण पाणी पुरवठा समितीतील सदस्यांना योजनेतील कामांची निश्चितता कळून आलेली नाही.
बोरघर येथे लोकवर्गणी अजून जमा झालेली नाही. ग्रामपंचायतीला न कळवता बक्षिसपत्रे झालेली नसतांनाही काम चालू केले गेले आहे. सदरचे काम उप अभियंता बुटाला यांच्या आदेशाने सुरू केल्याचे ठेकेदार सांगत आहे. मंजूर अंदाजपत्रकातील पाण्याचे टाकी वेगळया ठिकाणी असून प्रत्यक्षात दुस∙या ठिकाणी टाकी बांधली जात आहे. अंदाजपत्रकातील कामे अंदाजपत्रानुसार केली जात नसून अंदाजपत्रकातील कामे व प्रत्यक्षातील कामे यात मोठी तफावत व विसंगती आहे. भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या निर्देशानुसार पाईप जमीनीच्या खाली कमीत कमी तीन फुट गाडला जाणे आवश्यक आहे. अर्थातच अंदाजपत्रकानुसार पाईप लाईनसाठी १ मीटरची खोदाई व ०.७५ मीटरची रुंदी असून पाईपाखाली मुरुमाचे समान अस्तर पसरवून त्यावर चांगल्या मुरूमाणाची भर टाकावयाची आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र दिड फुटही खोदाई नसून वरच्यावर खोदाई करून पाईप टाकले गेले आहेत. लोकवर्गणी जमा नसतांना व कागदोपत्री पुर्तता नसतांना चुकीच्या पध्दतीने कामे सुरू करून लाखों रुपयांची बिले काढून मोठया रकमा ठेकेदारांना अदा केल्या जात आहेत. वापरण्यात येणारे पाईपांची व इतर सर्व साहित्याची गुणवत्ता तपासून घेणेही ग्रामपंचायतीना आवश्यक आहे.
सदर बाबी नियमबाहय असून लेखापरिक्षणात अडचणीचे ठरून व अनेक ठिकाणी योजनेच्या कामात तक्रारी दाखल होत असलेने भविष्यात सरपंच व ग्रामसेवक व संबंधित अधिकारी मोठया कारवाईत अडकले जाणार आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना अल्पावधीत नादुरुस्त होवून जनतेच्या समस्या वाढणार आहेत. जल जीवन मिशनच्या कामांत मोठा भ्रष्टाचार होत असून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी म्हणून आपण पत्रव्यवहार व प्रयत्न करणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.












