हत्तीवरून साखर वाटत निघणार शोभायात्रा
रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी) गेली पाचशे वर्ष ज्या क्षणाची समस्त हिंदूधर्मीय जनता वाट पाहत होती तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार असून त्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. गेल्या शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर आणि अगणित न्यायालयीन लढायानंतर राममंदिर न्यासाच्या बाजूने निकाल लागला आणि भव्य राम मंदिर निर्माण झाले. यासाठी अनेक राम भक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देश विदेशात रामभक्तीची लाट पसरली आहे.ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या सुरक्षा कारणास्तव 22 जानेवारी रोजी कोणीही आयोध्येत येऊ नये असं आवाहन केलं होतं. त्यामुळं अनेकांचे मन व्यथित झालं. हा अद्भुत, ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहायला मिळेल हे स्वप्न भंगल्यानं अनेक भारतीय नागरिकांनी आता पंतप्रधानांच्या आव्हानानुसार घरातच राहून आपापल्या परीने हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे.
अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जालगांवसह दापोलीमध्ये हत्तीवरून साखर वाटपाची शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. दापोली दाभोळ या मार्गावरुन हत्तीवरुन साखर वाटप भव्य शोभा यात्राचे आयोजन करण्यात आले असुन जालगांव भैरीमंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा पर्यत प्रभु श्रीरामाचे व मारुती रायाचे मोठमोठे 8 कटाउंट,रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंड्यांसहित संपूर्ण रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळा निमित्त देशभर विविध कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून या भव्य शोभायात्रेची तयारी दापोली येथे सुरू आहे. जालगांव गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरी मंदिरापासून या शोभायात्रीची सुरुवात केली जाणार आहे. वडाचा कोंड, बुरोंडी नाका, फॅमिली माळ, दापोली बाजारपेठ,मच्छी मार्केट, एसटी स्टँड येथून ही शोभायात्रा निघणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा दापोली शहरातील अश्वारूढ पुतळ्याजवळ या शोभायात्राची सांगता होणार आहे.
हत्तीवरून साखर वाटण्याचा बहुमान त्यावेळेला अयोध्या येथे गेलेल्या कार सेवकांना दिला जाणार आहे. गजराजाच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेसाठी संबंधित कारसेवकांना खास आमंत्रण देण्यात आले आहे.












