खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी झाला पण या मार्गावर सर्व्हिस रोड धोकादायक असून, योग्य वाहतूक नियमन होत नसल्याने खेड तालुक्यातील भरणे ते रेल्वे स्टेशन मार्गे वेरळ खोपी फाटा या भागात अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दापोलीकडून येणारे गौण खनिज वाहतूक करणारे ट्रक व अन्य लहान मोठी वाहने काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी उलट्या दिशेने महामार्गावर जात असल्याने कोणत्याही क्षणी भीषण अपघात होऊन जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा भाग पूर्वी वळण रस्ते, जीर्ण पूल व घाट यांच्या मुळे धोकादायक बनला होता. मात्र ही समस्या चौपदरीकरणामुळे सुटेल असे वाटत असताना आता मात्र वेगळ्याच समस्या समोर येऊ लागल्या आहेत. कशेडी ते परशुराम घाट हा ४४ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्गाचा भाग जवळपास सर्वच ठिकाणी चौपदरी झाला आहे. मात्र, या रस्त्यातील सर्वाधिक धोका भरणे नाका उड्डाण पूल, जगबुडी पूल ते रेल्वे स्टेशन या भागात आहे. हे गेल्या काही महिन्यात झालेल्या अपघातातून सिद्ध झाले आहे.
या मार्गावर शिमगोत्सवात वर्दळ वाढणार आहे. यामुळे आताच वाहतुकीचे नियोजन करण्यासह वाहनचालक अन् पोलिसांनीही दक्षता घेण्याची गरज आहे. अवजड वाहने येथे पुलावर अपघातग्रस्त झाली आहे. दुचाकी घसरून दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे.
सर्व्हिस रोड बनवताना अनेक त्रुटी राहिल्याने व या भागात वाहतूक पोलिस किंवा कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने या भागात प्रवास धोकादायक बनला आहे. योग्य सर्व्हिस रोड उपलब्ध नसल्याने सोयीचा म्हणून अनेक जण राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही भागांचा ये-जा करण्यासाठी राजरोस वापर करत आहेत. परिणामी महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी योग्य सर्व्हिस रोड बनवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या तज्ज्ञांमार्फत संबंधित ठेकेदाराने बजावणे आवश्यक आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊन अपघात वाढत असतील तर पोलिसांच्या वाहतूक शाखेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु मुंबई-गोवा महामार्गाच्या या भागात आताच संबधित विभागाने लक्ष न दिल्यास भविष्यात येथे भीषण परिस्थितीत निर्माण होण्याची शक्यता आहे.










