रत्नागिरी : श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय भंडारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार, लेखक अभिजीत हेगशेट्ये यांचा प्रतिभावान व्यक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने पतितपावन मंदिरात घेण्यात आला.
या वेळी कोळी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष अॅड. चेतन पाटील, जैन समाज संघाचे वर्धमान स्थानकवासी महेंद्र गुंदेजा, श्रीमान भागोजीशेठ कीर यांचे नातू अंकुर कीर, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, भंडारी समाज नेते कुमार शेट्ये, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, प्रसिद्ध व्यावसायिक राजन मलुष्टे, परीट समाज संघाचे अध्यक्ष अमित कोरगावकर, दलित मित्र एस. बी. खेडेकर, तेली समाज संघाचे सचिन लांजेकर, भगवती देवी ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. हेगशेट्ये यांच्यासह बांधकाम व्यावसायिक प्रसाद वाघधरे, भजनीबुवा सुदेश नागवेकर, प्रतिभावंत कवी देविदास पाटील, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती प्रकाश वराडकर यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी, मंडप सजावटीसाठी संतोष डेकोरेटर्सचे नवनीत कदम यांचाही सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख वक्ते श्री. बांदिवडेकर म्हणाले, ‘भागोजीशेठ कीर यांनी अनेक धडे घालून दिले, जातीय भेदभाव करू नये हा सर्वांत मोठा धडा त्यांनी घालून दिला. ते मानवतावादी होते, हिंदूत्ववादी होते म्हणूनच कार्य करताना त्यांनी केवळ आपल्या समाजापुरतेच न करता मानवतेसाठी केले, देशासाठी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीपुरुष होते, त्यांच्याकडूनच भागोजीशेठना प्रेरणा मिळाली. त्यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणजे हे पतितपावन मंदिर. त्यावर कुणीही अधिकार सांगू नये. हे मंदिर सर्वांचे होते आणि राहील.’
ते पुढे म्हणाले, ‘भागोजीशेठनी आपली मुंबईतील नऊ एकरचा भूखंड दिला, पण या महामानवाला मात्र ९० फुटांमध्ये बंदिस्त करण्यात आले. ही गोष्ट राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर गेल्यावर्षी मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहरात नाना शंकरशेठ आणि भागोजीशेठ कीर यांचे पुतळे उभारणार असल्याची घोषणा केली आणि त्यासाठी २० कोटींची तरतूदही केली. मात्र त्यांचे हे स्मारक त्यांच्याच भूमीत व्हावे, अशी आमची मागणी आहे. आजच्या मुलांना चुकीचा इतिहास शिकविला जात आहे. आठवीच्या पुस्तकात पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधले असा उल्लेख आहे, मात्र हे मंदिर भागोजीशेठ यांनी बांधले असून, यासंदर्भातही शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असून, लवकर त्यात बदल केले जातील, असे सांगण्यात आले आहे.’
या प्रसंगी प्रस्तावना करताना राजीव कीर यांनी भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सौ. प्रज्ञा तिवरेकर यांनी केले.











