खेड-दापोली-मंडणगडातील २१,२४३ ग्राहकांचा समावेश,मार्चअखेर साठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके सज्ज
खेड(प्रतिनिधी)खेड, दापोली व मंडणगड तालुक्यातील २१ हजार २४३ ग्राहकांकडून मार्चअखेरपर्यंत वीज वसुलीसाठी महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर ५ कोटी ७८ लाखांचा टार्गेट आहे. थकीत बिलासाठी शाखास्तरावरील कर्मचारी ग्राहकांपर्यंत पोहचून दवंडी पिटत आहेत. त्याकडेही दुर्लक्ष करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी महावितरणने ठेवली आहे. कर्मचाऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गतवर्षपिक्षा यंदा दीड कोटीहून अधिक रक्कमेची घट झाल्याचे दिसून आले आहे.
घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेती, पथदिपे, पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व शेतीविषयक इतर ग्राहकांना महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा केला जातो. खेड उपविभागात ४०८४ ग्राहक असून १ कोटी ३२ लाखांची थकबाकी आहे. लोटेमध्ये ३३०० ग्राहक असून १ कोटी २१ लाख, दापोली नं. १मध्ये ४२०७ ग्राहकांकडे १ कोटी ८ लाख, दापोली नं. २ मध्ये ४५२३ ग्राहकांकडे ८२ लाख तर मंडणगडमधील ५१२९ ग्राहकांकडून १ कोटी ३५ लाखांच्या वसुलीचे उद्दीष्ट आहे. विभागीय कार्यकारी अभियंता विशाल शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकाऱ्यांसह तालुकास्तरावरील शाखाधिकारी व वीज कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात केली आहेत. महावितरणने दर महिन्याला थकित ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी मोबाईलवरून एसएमएसद्वारे नोटीसाही बजावल्या आहेत.
घरोघरी जावून वीजबिल भरण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून तगादा लावला जात असल्याने फेब्रुवारीअखेरपर्यंत बहुतांशी थकीत ग्राहकांनी वीज देयके भरणा केली.. यामुळे गतवर्षी ७ कोटी ४२ लाखाचे असणारे टार्गेट यंदा ५ कोटी ७८ लाखांवर येवून ठेपले आहे.
दापोली नं. १ व २, खेड, लोटे, मंडणगडमध्ये १६१०४ घरगुती ग्राहकांकडे १ कोटी ४ लाखाची थकबाकी आहे. १२२६ व्यापाऱ्यांची ३८ लाखांची, २१६ औद्योगिक ग्राहकांची ५५ लाख, २२४५ शेतकऱ्यांची ७२ लाख, केवळ १८ शेतीविषयक इतर ग्राहकांची ३ लाख, ४४० पथदिपांचे १ कोटी ९३ लाख, ३३३ पाणीपुरवठा योजनेच्या बिलांची ८७ लाख थकबाकी तर ६६१ सार्वजनिक सेवांचे २६ लाखांची थकबाकी आहे.
थकीत वीजबिल भरा वरिष्ठ पातळीवरून वीजबिल वसुलीसाठी सक्त आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची गांभिर्याने दखल घेतली जात असून दापोली, खेड व मंडणगड तालुक्यातील ग्राहकांनी वीजबिल देयकासह थकीत रक्कम भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय कार्यकारी अभियंता विशाल शिवतरे यांनी केले आहे.










