रत्नागिरी | प्रतिनिधी : शिमगोत्सवातील पारंपारिक पद्धतीप्रमाणे वरवडे खाडीत फिरण्यासाठी गेलेली खारवीवाड्यातील खाजगी बोट उलटली. बोटीतील सुमारे 12 मुली पाण्यात पडल्या मात्र शिमगोत्सवामुळे किनार्यावर स्थानिक मच्छिमार उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ सर्व मुलींना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना मालगुंड प्रा.आ. केद्रात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र या नौकेत प्रमाणापेक्षा अधिक माणसे असल्याने वजन वाढल्याने ही नौका खाडीत उलटली आणि मुली पाण्यात पडल्या असल्याचे कारण पुढे आले आहे.
शिमगोत्सव असल्याने खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळे एकाच वेळी पाण्यात पडलेल्या 12 मुलींना स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी 12.30 वा.सुमारास हि घटना घडली होती. दरवर्षी शिमगोत्सवाला खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जाण्याची वरवडे खारवीवाडा येथील समाजाची प्रथा आहे. रविवारी असलेल्या होळी निमित्त वरवडे येथील काही नौका खाडीत उतरल्या होत्या. यातील एक नौका खाडीत उलटली. या नौकेत प्रमाणापेक्षा अधिक माणसे असल्याने वजन वाढल्याने ही नौका खाडीत उलटली.
या बोटीत एकाच कुटुंबातील जवळपास 12 मुली होत्या. संबधित नौका निलेश सुर्वे यांच्या मालकीची आहे. बोट उलटताच बोटीतील मुलींनी एकच आरडाओरड केली. यावेळी आजूबाजूला असलेल्या नौका मालकांनी बचावासाठी धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, जयगडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कुलदिप पाटील, पोलीस उपनिरिक्षक क्रांती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढलेल्या 12 मुलींना मालगुंड प्रा.केंद्रात दाखल करण्यात आले होते. सर्व मुलींची प्रकृती उत्तम असल्याने सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र ऐन शिमगोत्सवात नौका बुडाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.











