दोडामार्ग | सुहास देसाई : पणजी- पोर्तुगीज भाषेत बी.ए. व एम. ए. करण्याची देशात एकमेव सोय असलेल्या गोवा विद्यापीठात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन पोर्तुगीज विभागातर्फे करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमासाठी आॕनलाईन तसेच प्रत्यक्ष नोंदणी सुरू झाली आहे.
गोवा विद्यापीठातील पोर्तुगीज विभागाचे कार्यक्रम संचालक प्रा. ध्रुव उसगावकर यांनी सांगितले की, मला सांगायला अभिमान वाटतो की भारतातील फक्त गोवा विद्यापीठ पोर्तुगीज भाषेत बीए आणि एमए हे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. फ्रेंच, मँडारीन आणि स्पॅनिश या जगात सर्वाधिक मागणी असलेल्या भाषा आहेत. त्या पाठोपाठ पोर्तुगीज भाषेलाही महत्त्व आहे. जगात अनुवादकांना सगळीकडेच मागणी आहे. अनेकदा अनुवादक मिळत नाहीत. पोर्तुगीज अनुवादकांची गोव्यातही कमतरता आहे. जुन्या पोर्तुगीज दस्तऐवजांचे भाषांतर आवश्यक असलेली अनेक सरकारी पदे अजूनही रिक्त आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये देखील अनुवादक आवश्यक आहेत. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कंपन्यांमध्ये इंग्रजी-पोर्तुगीज भाषिकांसाठी बऱ्याच काळापासून पदे रिक्त आहेत.











