वयाचा अमृत महोत्सवी टप्पा केला पार
चिपळूण ( वार्ताहर) : शहरातील शंकरवाडी येथील कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि कुणबी सेनेचे महाराष्ट्र समितीतील सदस्य शंकर उर्फ( दादा) बैकर यांना कुणबी शिक्षण मंडळाच्या वतीने 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
दादा बैकर हे गेले अनेक वर्ष कुणबी समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे. ग्रामीण भागात तळागाळातील लोकांशी प्रत्यक्ष संपर्क करणारे आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अग्रेसर असणारे असे हे दादा बैकर यांचे नेतृत्व आहे. अनेक वर्ष कुणबी सेनेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांशी संपर्क वाढवला आहे. त्यांची शारीरिक स्थिती पाहता ते एका पायाने अपंग असले तरीसुद्धा त्यांच्यातील काम करण्याची ऊर्जा आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरी तरुणांना लाजवेल अशीच आहे. त्यांचे नेतृत्व नेहमीच समाजातील युवकांना प्रेरणा देणारे ठरले आहे. समाजात ज्या ठिकाणी सुखापेक्षा दुःखाचा प्रसंग असेल त्या ठिकाणी ते नेहमीच पोहोचतात.हे त्यांच्या कडून शिकण्यासारखे आहे.
कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण मध्ये सुद्धा गेली अनेक वर्ष ते कार्यरत आहेत. समाजाचे कुठल्याही काम असेल तर त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती अग्रेसर असते. त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कार्याची दखल घेत त्यांना चार पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. समाजभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. नुकतीच त्यांनी वयाची 75 वर्षे पार केली आहे. त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.
या निमित्ताने कुणबी शिक्षण मंडळ चिपळूणच्या वतीने सुद्धा दादा बैकर यांचा शाल श्रीफळ पुष्गुच्छ देऊन अध्यक्ष वसंत उदेग आणि सर्व संचालकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व संचालक मंडळ, कळंबट हायस्कूल मधील शिक्षक व कर्मचारी वर्ग सुद्धा या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित होते.











