राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील प्रिंदावण गावचे सुपुत्र, नाणार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, प्रथितयश भजनी बुवा, उत्कृष्ठ हार्मोनियम वादक व संगीतातील जाणकार उदयबुवा गोखले (६५) यांचे सोमवारी सकाळी रत्नागिरी येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
उदय गोखले हे नाणार हायस्कुल स्थापनेपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते, ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजनाचा पाया रचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. उत्तम अभिनय सादर करणारे उदयबुवा हे भजन क्षेत्रात अधिक लोकप्रिय होते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व मुंबई येथे डबलबारीचे कार्यक्रम ते सादर करत असत. सहयोग या रत्नागिरीतील नाट्य संस्थेकडून संगीत नाटकांमध्ये ऑर्गन साथीबरोबरच अभिनय ही त्यांनी सादर केला. संगीत मृच्छकटिक नाटकात त्यांनी अभिनय केला. त्याचप्रमाणे सहयोगने सादर केलेल तीन संगीत नाटकांना ऑर्गन साथीसाठी गोखले यांना पारितोषिक मिळाले होते.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी, या मंडळाचे संस्थापकीय सदस्य, मार्गदर्शक, भजन रसिकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे भजन क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे भजनरत्न बुवा उदय गोखले यांची सर्वदूर ख्याती होती. त्यांच्य निधनाने कुटूंबासह साऱ्या मित्र परिवारावर दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.











