प्रस्तावित सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या जागेची वाटुळ येथे पालकमंत्र्यांकडून पाहणी

 

१५ऑगस्टपूर्वी राज्य शासनाकडून मंजुरी: पालकमंत्री उदय सामंत

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबईच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू असलेल्या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी वाटूळ येथील या प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. तर या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलला १५ ऑगस्ट पूर्वी शासनाकडून मंजुरी मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

रविवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज वाटुळ येथील प्रस्तावित सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसिलदार शीतल जाधव, राहुल पंडित, बाबू म्हाप, पंचक्रोशी ग्रामसमितीचे आदिनाथ कपाळे, विश्वास राघव आदी उपस्थित होते.

जागेची पाहणी करताना सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरु ठेवावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सुपरस्पशालिटी हॉस्पीटलला २५ पैकी ५ एकर जागा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत यांनी पाठपुरावा केला. सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त रंगा नायक यांच्याकडे सध्या हा प्रस्ताव आहे. अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे तो जाईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून १५ ऑगस्ट पूर्वी त्यास मंजुरी मिळेल. राजापूरकरांच्या दृष्टीने हे हॉस्पीटल अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे नजीकच्या हे हॉस्पिटल उभे राहताना पाहायला मिळेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

राजापूरवासियांची आरोग्य विषयक होणारी हेळसांड लक्षात घेवून पंचक्रोशी ग्रामविकास समितीने राजापूर परिसरात महामार्गावर हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व्हावे अशी मागणी करताना सातत्याने त्याचा शासनाकडे पाठपुरावा केला. या हॉस्पीटलसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र कोकण झोनमध्ये एकच हॉस्पीटल होत असल्याने ते ठाणे येथे गेल्याची चर्चा होत होती. मात्र ही चर्चा खोडून काढताना पालकमंत्री उदय सामंत यांनी युती शासनाने हे हॉस्पीटल करण्याचे ठरविले असून लवकरच त्याची प्रत्यक्ष कार्यवाही होईल अशी ग्वाही पंचक्रोशी समिती आणि राजापूर वासियांना दिली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यानी वाटूळ येथे जागेची पाहणी केली. यावेळी पंचक्रोशी समितीचे पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबई सरचिटणीस विश्वास राघव, उपाध्यक्ष सुरेश मेस्त्री, संतोष जोगळे, प्रकाश दळवी प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे, सदस्य दिपक चौकेकर, अमोल सुतार, अक्षय तांबे, संतोष आरावकर, अविनाश राघव ग्रामीण सदस्य सुधीर विचारे अशफाक मापारी, संजय कपाळे, राजेंद्र बाईत, संतोष मोंडे, संतोष शिंदे, चंद्रकांत लोळगे आदी उपस्थीत होते.