देवरुख-ओझरे-काटवली रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांचे साम्राज्य

 

रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास “पंचक्रोशीचा राजा” मंडळ मोर्चा काढणार

देवरूख (प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-ओझरे रोड स्वामी समर्थ मठ ते टिकळेश्वर दर्शन थांबा या सुमारे ३ किमी रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणे वाहनचालक तसेच नागरिकांची रोजची डोकेदुखी बनत आहे.

 

 

जुलै महिन्यात या रस्त्याची ५० मीटरची डागडुजी करण्यात आली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डयातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. हा मार्ग पुढे काटवली, सायले, सोनवडे, ओझरे, बोरसूत, वाशी कुळये आदी गावांना जोडलेला आहे. या मार्गांवरून बसफेऱ्याही सुरु आहेत. येत्या गणेशोत्सवापूर्वी हे धोकादायक खड्डे भरण्यात यावेत अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून होत आहे. अन्यथा येथील “पंचक्रोशीचा राजा” हे मंडळ आक्रमक भूमिका घेऊन संबंधित विभागावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.