*कृषिदूतांची वारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दारी*

रत्नागिरी | गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण,चिपळूण येथे शिकत असलेले विद्यार्थी कृषीविषयक कार्यामध्ये सदैव तत्पर असतात, यातील ‘कृषिविश्व’ संघातील कृषीदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नुकतीच रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन संस्थेचे कामकाज, कृषी माल खरेदी-विक्री, मालाची साठवणूक करण्यासाठी असलेली गोडाऊन व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी विविध योजना अन्य बाबींची माहिती घेऊन व्यवस्थापन व कामकाजाविषयी जाणून घेतले.

 

भारत हा कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था शेती व शेतीसंबंधी उत्पन्न तथा उत्पादनावर अवलंबून आहे. सहकार व पणन कायद्याअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती यांची स्थापना झाली. या बाजार समितीचे कामकाज कसे चालते याची प्रात्यक्षिकासह माहिती घेण्यासाठी महाविद्यालयातील ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, संग्राम पाटील, सुमित सावंत, अनिकेत मस्के, सुयश शिंदे, यश मगर, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके या कृषिदूतांनी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला २६ ऑगस्ट रोजी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पांडुरंग कदम यांनी या कृषिदूतांचे स्वागत करून त्यांना संपूर्ण परिसर दाखवत चालू असलेल्या कामांविषयी शैक्षणिकदृष्ट्या माहिती दिली.