चिपळूण (वार्ताहर) : देशप्रेम आणि देशभक्ती ज्यांच्या हृदयात सामावलेली आहे, असे भारतीय सैनिक सर्व नागरिकांची शान आहेत. देशाच्या सीमेवरती लढण्यासाठी सज्ज असलेले आपले भारतीय जवान नेहमीच आपल्याला प्रेरणास्थानी राहिलेले आहेत. अशीच भारत भूमीची सेवा करणारे बामणोली येथील नव्या पिढीतील पहिले तरुण भारतीय सैनिक दलात दाखल होणारे हवालदार मनोज सिताराम तांबे जे बावीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा बामणोली गावी १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता साई मंदिर या ठिकाणी आयोजित केला आहे.
ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देश सेवेत जाणारे मनोज तांबे हे अतिशय हुशार आणि परिश्रम घेणारे आहेत. ते दिनांक ५ ऑगस्ट २०१२ रोजी भारतीय सैनिक दलात मराठा लाईट इन्फंट्री बेलगाम येथे रुजू झाले. त्यानंतर त्याने अनेक ठिकाणी सेवा बजावले आहे. त्यामध्ये पहिल्यांदा त्यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीर येथे झाली. त्यानंतर सिक्कीम येथे चीन बॉर्डर वरती सुद्धा त्याने काम केले आहे. नंतर पुणे, पुन्हा जम्मू काश्मिर, त्यानंतर पश्चिम बंगाल, भूतान, दिल्ली, मध्य प्रदेश आणि शेवटी बेळगाव पठाणकोट येथे त्यांनी सेवा बजावली आहे. संघर्षमय सेवा बजावत ते ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. बामणोली गावासाठी ही अभिमानाची बाब आहे. मनोज तांबे यांचा सेवापूर्ती सोहळा त्यांची गावी दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता बामणोली साई मंदिर येथे होणार आहे. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांची गवळवाडी स्टॉप येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. हा आनंदी सोहळा अनुभवण्यासाठी आणि मनोज तांबे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिताराम तांबे आणि परिवाराने केले आहे.












