आता चर्चा नाहीच… मिऱ्यावासियानी नवा बॅनर लावून स्पष्ट केला निर्धार
रत्नागिरी । प्रतिनिधी
कोणीही कितीशी समजावले तरीही एमआयडीसी साठी आता मिऱ्या वासिय अजिबातच तयार नसून ‘प्रस्तावित मिऱ्या एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे’ अस ठणकावत पुन्हा एकदा नवं बॅनर मिऱ्या गावाजवळ लागले आहे. त्यात मिऱ्याचे सुपुत्र आणि माजी आमदार बाळ माने यांनी या जिल्ह्यातील प्रस्तावित एमआयडीसीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्याने आता इथले संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे.
निसर्ग संपन्न, पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक एल, धार्मिक वारसा लाभलेले मिऱ्या हे गाव स्वतःचे वेगळेपण नेहमीच जपते आहे. या गावातल्या रहिवाशांना, ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मिऱ्या हे गाव ज्या मतदार संघात येते त्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे गेले २० वर्ष आमदार असलेले उदय सामंत यांच्या एमआयडीसी विभागाने पोर्ट एमआयडीसी आणि त्यासोबत लॉजिस्टिक पार्कची घोषणा वृत्तपत्रात करत थेट अधिसूचनाच प्रसिद्ध केली. ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा निर्णय झाल्याने गावात निर्माण झालेला प्रक्षोभ, संताप आणि चीड ग्रामस्थांमध्ये आहे. त्या थेट सभा घेत आपला विरोध या एमआयडीसी ला दाखवला. गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनी सुद्धा गावकऱ्यांच्या सोबत राहत त्यांना पाठिंबा दर्शवलाच परंतु हा विरोध थेट भले मोठे बॅनर गावात झळकावत जाहीर सुद्धा केला.
त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोध असेल तर एमआयडीसी होणार नाही पण त्याआधी मी ग्रामस्थांशी बोलेन अशी भूमिका व्यक्त केली होती.
मात्र आता मिऱ्या वासिय कोणत्याही चर्चेस सुद्धा तयार नसल्याचे दिसत आहे. मी मिऱ्या वासियांशी चर्चा करेन या पालकमंत्र्यांच्या जाहीर वक्तव्यानंतर मिऱ्या येथे नवा बॅनर झळकला असून त्यामधे, ‘’प्रस्तावित मिऱ्या एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे… आपली घरदार… देऊळ… रुढी परंपरा… शांतता… आंबा काजू बागायती… मच्छीमार… यांच्या बदल्यात मिळणार काय तर वॉचमनच्या नोकऱ्या…! आणि धुळीचे साम्राज्य…! गावाचं गावपण जपूया… मिऱ्या गाव वाचवूया… समस्त मिऱ्या वासिय’’ असे हे बॅनर असून मिऱ्या वासियानी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.












