राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील चिखलगाव येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ व माजी पोलीस पाटील गोपाळ रामभाऊ नकाशे (८५) यांचे मंगळवार १ ऑक्टोबर रोजी रहाते घरी निधन झाले. चिखलगावचे माजी सरपंच योगेश नकाशे व राजापूर तालुका रास्त दर दुकान चालक संघटनेचे अध्यक्ष महेश नकाशे यांचे ते वडिल होत.
गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांची प्रकृती अधिकच ढासळली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर बुधवारी चिखलगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार राजन साळवी यांसह विवध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठया संख्येने उपस्थीत होती.
श्री. नकाशे यांनी आपल्या उमेदीच्या काळात गावात सामाजिक सलोखा व शांतता राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले. गावच्या धार्मीक व सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग दिला. त्यांनी आपल्या कार्यकतृर्त्वाचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाबद्दल चिखलगाव दशक्रोशीतून शोक व्यक्त करण्यात आला आहे.











