फळबागायतदार संघाची पत्रकार परिषदेत माहिती
बांदा l प्रवीण परब : महाराष्ट्र शासनाने काजू अनुदानापोटी मंजूर केलेले २७९ कोटी रुपये काजु उत्पादक शेतकऱ्यांना जाचक अटी शर्ती रद्द करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे या महत्वाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी सिंधुदुर्गातील शेतकरी आक्रमक झाला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार ४ आक्टोंबर रोजी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बांदा येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या कार्यालयात प्रस्तावित उपोषणाचा आढावा घेण्यासाठी संघाचे पदाधिकारी, शेतकरी यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उपोषणाची माहिती देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग शेतकरी आणि फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे खजिनदार दिवाकर म्हावळंकर, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कुंब्रल माजी सरपंच प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई, खजिनदार आकाश नारसुले, उपाध्यक्ष राकेश धरणे, समीर सावंत, जगदेव गवस आदी उपस्थित होते. सदर बैठकीत गावागावात सोशल मीडियाचा वापर करून, बैठका घेवून उपोषण विषय जनजागृती आणि महत्व पटवून देण्याचे ठरविण्यात आले.
विलास सावंत म्हणाले, सावंतवाडी प्रांत कार्यालय येथे होणाऱ्या उपोषणास शेतकरी व फळ बागायतदार संघ सावंतवाडी दोडामार्ग, सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादन संघटना कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ कणकवली, दोडामार्ग शेतकरी व फळ बागायतदार संघ, काजू समूह गोपुरी, राजा शिवाजी महाराज शेतकरी संघटना वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संरक्षण विकास संघटना, सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी व लाकूड व्यावसायिक संघटना, आंबा काजू उत्पादक बागायतदार शेतकरी संघटना वेंगुर्ला, स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ ओरोस, सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती, मराठा एकता ग्रुप सावंतवाडी या आणि इतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ, संघटनांनी उस्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे.
काजू बी अनुदान साठी मंजूर झालेल्या २७९ कोटी रुपयांचे काजू उत्पादक शेतकऱ्यांना अटी व शर्थी शिवाय दिवाळीपूर्वी वितरण करावे, काजुला किमान २०० रुपये हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाची त्वरीत अंमलबजावणी करावी, परदेशी काजूवर २० टक्के पर्यंत आयात कर आकारणी करावी, नारळ व सुपारी या पिकांना विमा संरक्षण मध्ये अंतर्भूत करावे, आंबा व काजू या पिकांच्या थकीत विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेती व फळबागायतीची नुकसान भरपाई देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, या प्रमुख मागण्या असल्याचे स्पष्ट केले.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी व फळबागायतदार यांनी सकाळी १० वाजता सावंतवाडी प्रांत कार्यालया समोर होणाऱ्या उपोषणात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी अध्यक्ष विलास सावंत यांनी केले.











