डेंजरस रॉक्स संघ उपविजेता
न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळाचे आयोजन
राजापूर | प्रतिनिधी : शहरातील न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळाच्या वतीने आयपीएलच्या धर्तीवर खेळविण्यात आलेल्या प्रकाश झोतातील अंडर आर्म किकेट स्पर्धेत अंतिम लढतीत डेंजरस रॉक्स संघाला नमवत पॉवर हिटर्स राजापूर संघाने एन.एच.डी. २०२५ चषकावर नाव कोरले. या स्पर्धेत पॉवर हिटर्स संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाचा बहुमान पटकावला तर डेंजरस रॉक्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते एनएचडी चषक २०२५ देऊन गौरविण्यात आले.
न्यु हनुमान दिवटेवाडी आयोजित ५१ वा क्रिडा महोत्सव नुकताच संपन्न झाला. यावेळी आयपीएलच्या धर्तीवर प्रकाश झोतातील अंडर आर्म किकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवटेवाडी येथील गोठण मैदानावर ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचा शुभारंभ मंगळवारी १४ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला होता. तर सांगता समारंभ १८ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगला होता. या स्पर्धेत आठ संघांना प्रवेश देण्यात आला होता. आयपीएल धर्तीवर साखळी पध्दतीने ही स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेच्या अंतीम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पॉवर हिटर्स संघाने डेंजरस रॉक्सला सहा षटकात ४५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पॉवर हिटर्सच्या भेदक गोलंदाजीमुळे जेमतेम २४ धावांपर्यंत डेंजरस रॉक्स मजल मारू शकला.
या स्पर्धेतील मालीकावीर म्हणून ओंकार थारळी, उत्कृष्ट गोलंदाज सलीम गडकर, उत्कृष्ट फलंदाज इशांत आडिवरेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सोहम भाटकर यांना तर उगवता तारा म्हणून रामचंद्र नार्वेकर याला गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाला नगराध्यक्ष एड.जमीर खलिफे, हनिफ मुसा काझी, शिवसेनेच्या युवानेत्या अपूर्वा सामंत, प्रज्योत खडपे, हर्षदा खानविलकर, राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. मोहनिश शिवदे, सुशांत मराठे, शैबाज खलिफे, राजेश खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रक्कम व मानाचा चषक एनएचडी चषक २०२५ देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळाचे अध्यक्ष गिरीष वादक, उपाध्यक्ष मनोज पवार, सचिव ऋतुराज दुदम, खजिनदार संजय कुळये, सदस्य निलेश सोगम, दिलीप आरेकर, अविनाश सोगम, प्रणय ढवळे, संदीप वादक, मंगेश ढवळे, अक्षय सोगम, कपिल राणे, नरेश राडी यांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. अत्यंत नेटके नियोजन करून मंडळाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.











