पायवाटेवरील झाडे तोडण्यावरुन वाद

मारहाण प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी :
नेमळे पाटकरवाडी येथे पायवाटेवरील झाडे तोडण्यावरुन वाद होऊन झालेल्या मारहाणीत आई व मुलगी जखमी झाली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात जखमी दिपाली दळवी (४०)हिने दिलेल्या तक्रारीवरून तिघां विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम अंकुश पाटकर (वय ५५ ), उर्मिला उत्तम पाटकर (वय ५० ), गीता उत्तम पाटकर (वय ३०, रा. नेमळे पाटकरवाडी )अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी दिपाली दळवी व त्यांची मुलगी प्रतीक्षा दळवी ही शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या समोरील पानंद पायवाटेवरील पालापाचोळा गोळा करीत असताना उत्तम पाटकर हे लोखंडी पाळकोयता हातात घेऊन तेथे आले व पाय वाटेच्या कडेची झाडे तोडणार असे सांगू लागला यावेळी फिर्यादी दिपाली हिने आमची झाडे आम्ही तोडून घेतो असे सांगितले असता त्याचा राग येऊन ती झाडे मिच तोडणार असे सांगून शिवीगाळ करू लागला त्यावेळी तेथे त्याची पत्नी उर्मिला पाटकर व मुलगी गीता पाटकर ही दोघी आली त्यांनी शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण करत दिपाली हिच्या हाताला हट्ट पकडले.

यावेळी उत्तम याने हातातील लोखंडी पाळ कोयत्याने तिच्या डोकीस मारून दुखापत केली.यावेळी दिपाली हीची मुलगी प्रतीक्षा सोडविण्यासाठी गेली असता तिलाही पाळकोयत्याची दुखापत झाली. याबाबत आज फिर्यादी दिपाली पाटकर हिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन उत्तम पाटकर व त्याची पत्नी व मुली याच्या विरोधात रितसर तक्रार दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी नेमळे पाटकरवाडी येथे जात घटनेचा रितसर पंचनामा करत या प्रकरणी गुन्हा दाखल केला.