भोपाळ– मध्यप्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये चीता वीरा ने दोन नव्या बछड्यांना जन्म दिला आहे. या बछड्यांसह आता कूनोमध्ये १६ बछडे आणि १० प्रौढ चित्ते आहेत. नव्या बछड्यांची प्रकृती चांगली असून, पार्क प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
हा प्रकल्प भारतात चित्त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ७० वर्षांपूर्वी देशातून नामशेष झालेल्या चित्त्यांना परत आणण्यासाठी २०२२ मध्ये नामिबियामधून आठ चित्त्यांची पहिली तुकडी आणण्यात आली होती. त्यानंतर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेले १२ चित्ते कूनोमध्ये सोडण्यात आले.
मात्र, या काळात आठ प्रौढ चित्ते आणि पाच बछड्यांचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाला काही अडथळेही आले. चित्त्यांची वाढती संख्या पाहता, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश यांनी १७,००० चौ. किमी क्षेत्रफळाचा विशेष ‘चीतापथ’ (Cheetah Corridor) विकसित करण्याची योजना आखली आहे.












