नवनियुक्त जिल्हाप्रमुख संजू परब यांचा शिवसेनेतर्फे सत्कार
पद मानाचं नसुन कामाचं ही जबाबदारी मानून काम करणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख हे पद मानाचं नसुन ते कामाचं आहे असे मी मानतो. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाची भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताना लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येथील आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी नवनियुक्त जिल्हाप्रमुख संजू परब यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबत राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो, राजू निंबाळकर, गजानन नाटेकर, बाबू कुडतरकर, हेमंत बांदेकर, सुनील डुबळे, प्रतिक बांदेकर, अर्चित पोकळे, परिक्षीत मांजरेकर, सुहासिनी सौदागर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, नंदू शिरोडकर, सुदन कवठणकर, देव्या सुर्याजी, बाळा शिरसाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजू परब म्हणाले,
शिवसेना पक्ष मजबूत होण्यासाठी सर्व जणांनी विचार मांडले. त्याचा आदर करत संघटना बांधणी करण्यावर भर दिला जाईल. मी यापूर्वी जेथे होतो तेथे संघटनात्मक बांधणी केली. त्यामुळे अभ्यास आहे. १७ जिल्हा परिषद आणि सावंतवाडी ,वेंगुर्ले व दोडामार्ग नगरपरिषदा क्षेत्रात संघटनेचे काम करत राहीन. आमदार दीपक केसरकर यांच्या विचारांशी बांधिलकी जपत समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत राहीन. शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे स्मरण करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवर्तन करत शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे. मला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता संजू परब यांच्याकडे ती जबाबदारी आहे ते देखील या पदाला निश्चितच न्याय देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करीत संजू परब यांना शुभेच्छा दिल्या.
सचिन वालावलकर म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी शिवसेना संघटनेची बांधणी करून विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त केले. दिपक केसरकर देखील चौथ्यांदा विजयी झाले. राज्यात परिवर्तन झाले. पुढील काळात शिवसेना संघटनेची बांधणी करून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपरिषद निवडणूकाना सामोरे जायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाने दोन आमदार दिले. जिल्ह्यात शिवसेनेची ही ताकद आहे ही ताकद अधिक वाढविण्याची जबाबदारी संजू परब यांच्यावर असून आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तर माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो यांनी देखील संजू परब यांना शुभेच्छा देताना महिलांची संख्या वाढती आहे. सर्वांना बरोबर घेऊन संजू परब काम करेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.












