विद्यार्थ्यांनी शिक्षणातुन स्वतःला घडवत आदर्शवत बनावे : अप्पा धनावडे

जि. प. आदर्श प्राथ. शाळा वाटद कवठेवाडीचा ६७ वा वर्धापन दिन साजरा

‘जाणू लोकांना, अनुभवू लोकांना आणि समृद्ध करू स्वतःला’ उपक्रमास सुरुवात

खंडाळा : प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण खूप महत्वाचे असते. शिक्षणाने सर्व गोष्टी साध्य करता येतात. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाच्या प्रवाहात राहून स्वतःला घडवत मोठे कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अप्पा धनावडे यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाणू लोकांना, अनुभवू लोकांना आणि समृद्ध करू स्वतःला या उपक्रमानंतर्गत घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत व्यक्त केले.

 

सुरुवातीला दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वागत झाल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अप्पा धनावडे यांनी उत्तरे देत मते मांडली. यावेळी त्यांनी आपल्या मुलाखतीतुन व्यक्त होताना आपला जीवनप्रवास सांगून कार्यरत असलेल्या विविध क्षेत्राची माहिती दिली. समाजात असणारे वाईट प्रवृत्ती, वाईट विचार नष्ट होण्याची आवश्यकता असून तरुणांनी आणि लोकांनी यासाठी सजग राहिले पाहिजे. महत्वाचे म्हणजे आपापसातील विविध मत – मतांतरे बाजूला ठेवून लोकांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. आज शाळांमधून सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन शाळेत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उत्तम घडवावे. कारण तीच मुले भविष्यात टिकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित असणारे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत सुर्वे यांनी शाळेच्या आश्वासक प्रगतीचे कौतुक करताना अशा उपक्रमाची गरज असल्याचे सांगितले. कवठेवाडी शाळा नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रम राबवून विद्यार्थी घडविण्यासाठी पुढाकार घेत असते. त्यामुळे या शाळेची प्रगती होताना दिसून येत असल्याने मला अभिमान असल्याचे सांगितले.
शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने जाणू लोकांना, अनुभवू लोकांना आणि समृद्ध करू स्वतःला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती विद्यार्थी घेणार असून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्ननिर्मिती केली असून त्यातून ते त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची माहिती घेणार आहेत. या उपक्रमाचा पहिला भाग आज संपन्न झाला आहे.

 

यावेळी प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी या उपक्रमाचे स्वरूप आणि महत्व सांगताना या उपक्रमाची गरज स्पष्ट करून सांगितली. तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका राधा नारायणकर यांनी आभार मानत अप्पांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या उपक्रमाचे नियोजन रत्नागिरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, प्रभारी केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि शिक्षिका राधा नारायणकर यांनी केले असून, या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती धनावडे, सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या प्रमुख सुवर्णा धनावडे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा मनस्वी तांबटकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अनिल रेवाळे, बालरक्षक विश्वनाथ शिर्के यांच्यासह सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत.
यावेळी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.