Two mobile eye clinic vans of Infigo inaugurated by Chief Minister Eknath Shinde in Ratnagiri today.
पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती.
डोळ्यांची संपूर्ण तपासणी करणारा “फिरता दवाखाना आपल्या दारी” उपक्रम.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता येथील ग्रामीण भागातील जनतेची गरज ओळखून इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने ‘मोबाईल आय क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. “डोळ्यांचा दवाखाना व डॉक्टर तुमच्या दारी” अशी मुख्य योजना इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने सामाजिक जबाबदारीतून हाती घेतली आहे. यासाठी फिरता दवाखाना असलेल्या दोन मोबाईल आय क्लिनिक व्हॅनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि. २५ मे रोजी होणार आहे.इन्फिगो आय केअर हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील नामांकित डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. महाराष्ट्राभर या हॉस्पिटलच्या विविध शहरांमध्ये शाखांची शृंखला आहे. दिवसेंदिवस हा विस्तार वाढतच आहे. या माध्यमातून अत्याधुनिक व अद्ययावत नेत्रसेवेची संधी रुग्णांना उपलब्ध झाली आहे. डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर याठिकाणी उपाययोजना होतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील दूरवर पसरलेल्या दुर्गम भागातील जनतेची गरज ओळखून इन्फिगोने ही फिरता दवाखाना योजना सुरू केली आहे. यामागे सामाजिक जाणीव जबाबदारी महत्त्वाची आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. फिरत्या दवाखान्याची सुविधा जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण रत्नागिरी अशा दोन भागात केली आहे. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी एक तर दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी दुसरी अशा दोन मोबाईल आय क्लिनिक व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक शहरातील आठवडा बाजारात देखील या व्हॅन उपलब्ध राहणार आहेत.
या मोबाईल आय क्लिनिक व्हॅनमध्ये नेत्र तपासणीची अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे या सर्व तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची कोणतीही गरज नाही. या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून डॉक्टरांकडून संपूर्ण नेत्र तपासणी करण्याची संपूर्ण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये चष्म्याच्या दोन पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह अचूक नंबर, डोळ्यांचा स्कॅन, डोळ्यांच्या पडद्याचा थ्री डायमेन्शन फोटो, डोळ्यांचे प्रेशर मोजणारा टोनोमीटर, ऑटो रिफ्राक्टोमीटर अशा सुविधा उपलब्ध आहेत.
ज्यांना मोतीबिंदू असेल आणि या मोतीबिंदू ऑपरेशन साठी आवश्यक असलेल्या चाचण्या करण्याकरता हॉस्पिटलला फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून डोळ्यांच्या भिंगाचं अचूक माप घेणारा एस स्कॅन यंत्र या फिरत्या दवाखान्यात बसविण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सामाजिक जडणघडणीमध्ये सर्वार्थाने योगदान रहावे या भूमिकेतून इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने ही सुविधा निर्माण केली असल्याची माहिती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही फिरत्या दवाखान्यांचा लोकार्पण सोहळा होणार असून हे भाग्य आम्हाला लाभले असल्याचे डॉ. श्रीधर ठाकूर यांनी शेवटी सांगितले.