खेड-तीनबत्तीनाका मार्ग खड्ड्यात, वाहनचालकांची कसरत

खेड(प्रतिनिधी)खेड नगरपरिषद कार्यालयाजवळील तीनबत्तीनाका येथील मार्ग पुरता खड्यात गेला आहे. या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे अन् तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीस अडसर निर्माण झाला आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत असली तरी नगरप्रशासन सुस्त असल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

तीनबत्तीनाका येथे नगर परिषद कार्यालयासह प्रवासी थांबा आहे. पावसामुळे या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा विस्तार वाढत आहे. येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मार्गच नसल्याने पाणी तुंबत आहे. खड्ड्यात साचणाऱ्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची फसगत होत आहे. यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे. जिजामाता उद्यानापर्यंच्या रस्त्याची अशीच अवस्था आहे. यामुळे नगर परिषद नगरप्रशासन याकडे लक्ष देणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.