मोती तलावात बुडणाऱ्या तरुणाला वाचवले

सावंतवाडी (प्रतिनिधी) – शहरातील मोती तलावात शनिवारी दुपारी एक तरुण बुडताना लोकांच्या निदर्शनास आला. ही बाब लक्षात येताच परिसरातील काही तरुण आणि नगरपालिका कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ पाण्यात उडी घेत त्याला सुखरूप बाहेर काढले. या प्रसंगात मोठा अनर्थ टळला.

नेमका हा तरुण पाय घसरून तलावात पडला की त्याने आत्महत्येच्या उद्देशाने उडी घेतली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही क्षणांमध्येच तरुण पाण्यात धडपडू लागला. त्यावेळी उपस्थित असलेल्या युवकांनी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी धाडसाने पाण्यात उडी घेत मदतकार्य केले.