रत्नागिरी – राज्य शासनाच्या ‘महारेन’ या पर्जन्यमापक प्रणालीने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, यंदा रत्नागिरी जिल्ह्यात १ जून २०२५ ते १ जुलै २०२५ या कालावधीत ८,४८१.७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हाच आकडा गेल्या वर्षी याच कालावधीत ८,३०३.८१ मिलिमीटर होता. यावरून यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
या वर्षी या कालावधीत सरासरी ९४२.४१ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे २८.०१ टक्के सरासरीचे प्रमाण आहे. मागील वर्षी २०२४ मध्ये याच कालावधीत सरासरी ९२२.६५ मिमी पाऊस पडला होता, ज्याचे प्रमाण २७.४३ टक्के होते.
रत्नागिरी जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी ३०,२७८ मिमी असून, हंगामात सरासरी ३,३६४.२२ मिमी पाऊस पडतो. यंदा पावसाचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर, म्हणजेच २० मेपासूनच झाले असून, त्यामुळे विविध क्षेत्रांवर त्याचा थेट परिणाम झालेला आहे.
पर्यटन व्यवसायाला फटका
कोकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळांमध्ये, विशेषतः गणपतीपुळे, आरे-वारे, पावस, अंजर्ले, गुहागर यांसारख्या ठिकाणी जून महिन्यात पर्यटकांची गर्दी अपेक्षित असते. मात्र पावसामुळे किनाऱ्यांवर ‘रेड अलर्ट’ लागू करण्यात आल्यामुळे पर्यटकांची वर्दळ कमी झाली आहे. लवकर पाऊस पडल्याने अनेक रिसॉर्ट्स, गेस्ट हाऊस आणि स्थानिक दुकानदार यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
मत्स्य व्यवसायही अडचणीत
रत्नागिरी जिल्हा हा कोकणातील एक प्रमुख मासेमारी केंद्र मानला जातो. मात्र पावसाच्या लवकर आगमनामुळे आणि समुद्र खवळलेल्यामुळे मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे अवघड झाले आहे. याचा परिणाम मासळीच्या पुरवठ्यावर आणि दरांवरही झाला आहे.
नैसर्गिक बदलांचे संकेत
वर्षानुवर्षे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचे आगमन होत असले तरी यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच रत्नागिरीसह कोकणात पावसाचे आगमन झाले. हवामानतज्ज्ञांच्या मते, हे हवामानातील बदलते चक्र असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.












