रत्नागिरी| प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यासाठी 15 जुलैला हवामान खात्याकडून रेड किंवा ऑरेंज असा कोणताही अलर्ट नसताना सुद्धा सोमवारी रात्रीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवली नद्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.
सोमवारी रात्रीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून रात्रभर हा पाऊस कोसळल्यामुळे जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. रत्नागिरीच्या पाटबंधारे मंडळ पूर नियंत्रण कक्षाकडून दुपारी बारा वाजता प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील नदी पातळी अहवालानुसार खेड तालुक्यातील जगबुडी नदीची सध्याची पातळी ही 6.80 मीटर इतकी होती ही नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. जगबुडी नदीची धोका पातळी ही सात मीटर इतकी आहे. तर संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीची सध्याची पाणीपातळी ही 7 मी. होती ही नदी सुद्धा इशारा पातळीच्या वर वाहत आहे. शास्त्री नदीची धोका पातळी 7.80 मीटर इतकी आहे. तर राजापूर तालुक्यातील कोदवली ही नदी सध्या 5.35 मीटर वरून वाहत असून ही नदी सुद्धा इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. कोदवली नदीची धोका पातळी 8.13 मीटर इतकी आहे.
याशिवाय जिल्ह्यातील वाशिष्ठी, सोनवी, काजळी, मुचकुंदी आणि बावनदीच्या पाणी पातळी सुद्धा काही अंशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.











