सावंतवाडी । प्रतिनिधी : आरोंदा रेडकरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या मनुष्यवस्तीत वन्यप्राण्यांच्या शिरकावामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून, वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोंदा रेडकरवाडी येथील शेतकरी श्री. विनायक अर्जुन रेडकर यांच्या घराजवळील गुरांच्या गोठ्यात काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाईचे वासरू जागीच ठार झाले.
सध्या जंगले मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसून पाळीव प्राणी, जनावरे आणि अगदी माणसांवरही हल्ले करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागात एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती वनविभागाला तात्काळ कळवण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे श्री. प्रकाश रानगिरे आणि श्री. पडते यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेऊन पंचनामा केला. यावेळी आरोंदा उपसरपंच श्री. गोविंद (आबा) केरकर आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. सिद्धेश नाईक हे देखील उपस्थित होते.
या परिसरात वारंवार अशा हल्ल्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याबाबतीत तातडीने लक्ष घालून वन्य प्राण्यांचा, विशेषतः बिबट्याचा, लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. उपसरपंच श्री. गोविंद केरकर यांनी या संदर्भात वनविभागाला निवेदन देणार असल्याचे सांगितले. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.













