लासा कंपनीच्या कामगारांचे आंदोलन आजपासून सुरू

कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ गेटवर ठिय्या

खेड (राकेश कोळी) – लोटे औद्योगिक वसाहतीतील नामांकित लासा सुपरजेनिक लिमिटेड या कंपनीच्या कामगारांनी आजपासून (सोमवार, २१ जुलै) सकाळी १० वाजल्यापासून अधिकृत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी लासा कंपनी प्रशासनाने काही कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून कमी केल्याची नोटीस कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली होती. त्यानंतर संबंधित कामगारांना कंपनीत प्रवेश नाकारण्यात आला.
यावर संतप्त झालेल्या कामगारांनी गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र, ही बाब पोलीसांच्या निदर्शनास आल्यानंतर लोटे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर ठिय्या आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे सांगून आंदोलनासाठी अधिकृत परवानगी नसल्याचे कारण देत कामगारांना तेथून हटवले.

त्यांना आंदोलनासाठी परवानगी घेऊनच पुन्हा आंदोलन करावे, असा सल्ला देण्यात आला.
कामगार प्रतिनिधी श्री. संजय आंब्रे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर कामगारांनी एकत्र येऊन अधिकृतरित्या लेखी पत्र खेड पोलीस ठाण्यात दिले. यानंतर आजपासून लासा कंपनीच्या मुख्य गेटसमोर अधिकृत परवानगीसह शांततामय मार्गाने ठिय्या आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार प्रतिनिधी श्री. ठसाळे यांनी दिली.
कामगारांचे हे आंदोलन बेकायदेशीर पद्धतीने नोकर्‍यांवरून कमी करण्यात आल्याचा विरोध म्हणून असून, त्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढा देत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनाकडे औद्योगिक क्षेत्रातील इतर कामगार संघटनांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे.