महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला दोन वर्षाचा कारावास

राजापूर (प्रतिनिधी): महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी राजापुरात एकाला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोटावण्यात आला आहे. राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. हाके यांनी ही शिक्षा सुनावली आहे. संजय शिवराम मांडवकर (वय ३६) असे या आरोपीचे नाव असून ही घटना १७ डिसेंबर २०२० रोजी घडली होती.

वाडीमध्ये जाणेसाठी कच्च्या रस्त्यावर फिर्यादी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने विनयभंग केला. त्यामुळे आरोपी संजय शिवराम मांडवकर याच्याविरुद्ध भा.दं. वि. कलम ३५४ (अ) (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास राजापूर पोलीस स्थानकातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. एम. वालावलकर यांनी केला. सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली आहे. विशेष सहाय्यक सरकारी वकील ओंकार अनिल गांगण यांनी कामकाज पाहिले. सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुभाष सुपेकर यांनी अंतिम युक्तिवाद केला.