चिपळूण (प्रतिनिधी) : “एक पेड़ माँ के नाम” या प्रेरणादायी उपक्रमाअंतर्गत कापरे देऊळवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आईप्रती कृतज्ञता व्यक्त करताना निसर्गाचेही रक्षण करणे. या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम व आईप्रती आदर जागविणारा हा कार्यक्रम खूपच भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
शाळेच्या परिसरात लिंब, गुलमोहोर, अशोक, सीताफळ, वड, पिंपळ अशा विविध जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे विशेष मार्गदर्शन मुख्याध्यापिका मा. मानसी महाडीक मॅडम यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना झाडांची महत्त्व, आईचं स्थान आणि आपली जबाबदारी याविषयी मार्मिक मार्गदर्शन केले. पदवीधर शिक्षक संतोष तांबे यांनी झाडांची निगा कशी राखावी, त्यांची वाढ कशी होईल याविषयी माहिती दिली. उपशिक्षक गणेश सुर्वे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व रोपांचे वाटप याचे सुयोग्य व्यवस्थापन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आईच्या आठवणी सांगितल्या आणि लावलेल्या झाडांची जबाबदारी आपलीच असल्याचे अभिमानाने सांगितले. पालकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.सर्व पालकांनी देखील आपल्या आईच्या नावाने झाड लावून सहभाग नोंदवणे,असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.सरपंच सुविधा कदम,उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशिष मोरे,माजी उपसरपंच दगडू कदम,माजी केंद्रप्रमुख तुकाराम गुरव सर आणि सर्व पालकांनी मुलांचे कौतुक केले आहे. हा उपक्रम पर्यावरण रक्षणासोबतच संस्कारक्षम पिढी घडविण्याकडे एक मोलाची पाऊलवाट ठरला.













