रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे रत्नागिरीत व्यास पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरीतील विविध भारतीय भाषांमधील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय स्तरावर सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धीसाठी राष्ट्रीय विचार घेऊन अखिल भारतीय साहित्य परिषद १९६६ पासून सर्व भारतीय भाषांमध्ये कार्यरत आहे. परिषदेची महाराष्ट्र आणि कोकणासह विविध प्रांतांचीही कार्यकारिणी आहे. परिषदेतर्फे वर्षभरात वसंत पंचमी, व्यास पौर्णिमा, वाल्मीकी जयंती, वर्ष प्रतिपदा आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. परिषदेची कोकण प्रांताची बैठक अलीकडेच मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात झाली. त्यामध्ये झालेल्या नियोजनानुसार प्रदेश उपाध्यक्ष आणि कुटुंब रंगलंय काव्यात फेम विसुभाऊ बापट यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत येत्या ३ जुलै रोजी व्यास पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि संगीत नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरीतील मराठी, उर्दू, हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्ये लेखन करणारे लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या उपस्थितीची नोंद सौ. मेघा कुलकर्णी-कोल्हटकर (73877 87512) यांच्याकडे त्वरित करून आपला व्हॉट्स अॅप क्रमांकही कळवावा. समारंभाचे ठिकाण आणि वेळ त्या क्रमांकावर कळविली जाईल, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.