सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी शहराच्या मुख्य रस्त्यांवरील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आज शहरात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाहतूक, पार्किंग, चोरी आणि परप्रांतीय फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी शहरातील पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. शहराच्या मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषदेशी चर्चा करून एका बाजूने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. पार्किंगच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. विशेषतः गणेश चतुर्थीच्या काळात पार्किंगबाबत कठोर पावलं उचलली जातील, असं त्यांनी नमूद केलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात पार्किंगसंदर्भात लावण्यात आलेल्या फलकांचा संदर्भ देऊन जुन्या उपाययोजनांची आठवण करून दिली.
परप्रांतीय आणि चोरीच्या घटनांवर लक्ष
या बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी शहरात वाढलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासावर चिंता व्यक्त केली. यावर पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी फेरीवाल्यांमुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असं सांगितलं. त्याचबरोबर, परप्रांतीय भाडेकरूंच्या नोंदी तपासण्यावरही लक्ष दिलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
सणासुदीच्या काळात अनेक जण बाहेरगावी जातात. याच संधीचा फायदा घेऊन शहरात चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केलं की, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीची किंवा घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. जनता आणि पोलिस यांच्या सहकार्यानेच शहरात शांतता राखून सण साजरे करता येतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
या बैठकीला सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, हिदायततुल्ला खान, बावतीस फर्नांडिस, नंदू गावडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









