चिपळूण तालुका सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा चिपळूण अर्बन बँकेतर्फे सन्मान

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या पतसंस्थेच्या २०२५-२६ ते २०३०-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नुकत्याच झालेल्या बिनविरोध निवडणुकीत चेअरमन म्हणून राजन गोविंद लवेकर व व्हॉईस चेअरमन म्हणून प्रसाद अनंत सागवेकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेतर्फे अभिनंदन करण्यात आले.
यासाठी चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्ष सतिश खेडेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी यांनी शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयास भेट दिली. यावेळी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष जितेंद्र वेस्विकरही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पतसंस्थेचे चेअरमन राजन लवेकर व व्हॉईस चेअरमन प्रसाद सागवेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल यांनी पतसंस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून, संस्थेच्या प्रगतीसाठी बँकेतर्फे सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्ष सतिश खेडेकर यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले. यानंतर बँकेचे चेअरमन मोहन मिरगल यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष राजन लवेकर, उपाध्यक्ष प्रसाद सागवेकर तसेच संचालक राजेंद्र वेस्विकर, प्रशांत सागवेकर, संदेश मिर्लेकर, सौरभ मिर्लेकर, सौ. निता पालकर व सौ. शिल्पा मिर्लेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उत्तरपर भाषणात उपाध्यक्ष प्रसाद सागवेकर यांनी बँकेच्या मान्यवरांचे आभार मानत बँक व पतसंस्थेचे संबंध अधिक दृढ करण्याची ग्वाही दिली. सुवर्णकार नागरी पतसंस्थेची स्थापना सुवर्णकार समाजाच्या आर्थिक गरजांसाठी झाली असली तरी आज ही संस्था सर्व समाजघटकांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच चिपळूण अर्बन बँकेकडून पुढील वाटचालीत मार्गदर्शन व सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.