कुडासेतील युवकाला अटक
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग – तिलारी मार्गावर वीजघर चेकपोस्टवर पोलिसांच्या कारवाईत गोवा बनावटीची साडे पाच लाख रुपयांची दारू आणि एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी महेंद्र गंगाराम खरवत (२१, रा. कुडासे वानोशीवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग पोलिसांचे पथक विजघर चेकपोस्ट येथे तपासणी करत होते. त्यावेळी एक संशयास्पद टेम्पो (केए २७ बी २६४२) थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात सुमारे ५ लाख ३८ हजार ५६० रुपयांची गोवा बनावटीची रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की आढळून आली. ही दारू विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात होती.
पोलिसांनी तात्काळ दारूसह टेम्पो जप्त केला. टेम्पोची किंमत ४ लाख ५० हजार रुपये असून एकूण ९ लाख ८८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, श्री. साटेलकर यांनी केली.
———













