‘ध्येयनिश्चिती’ हीच विद्यार्थ्यांच्या यशाची खरी ‘गुरुकिल्ली’ : ॲड. संतोष सावंत

सावंतवाडी । प्रतिनिधी : आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी संयम, मेहनत, अपार कष्ट आणि स्वतःवरील आत्मविश्वास जागृत करून आपल्या ध्येयाची ‘स्वप्ननगरी’ निश्चित करावी आणि ती प्रत्यक्षात ‘वास्तव्याची नगरी’ बनवावी. हीच वास्तव्याची नगरी तुमच्या अंगी असलेल्या गुणांची खरी मार्कशीट आणि तुमच्या जीवनाची गुरुकिल्ली ठरेल, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी केले.

सांगेली येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातील १० वी व १२ वीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आजचे बदलते स्पर्धात्मक युग आणि सामाजिक बदल’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. ए. जी. कांबळे, गणित शिक्षक मतीन उक्क द खान, ग्रंथपाल ओमप्रकाश जिज्ञास, मराठी शिक्षक जे. बी. पाटील, कारिवडे हायस्कूलच्या शिक्षिका सौ. अर्चना सावंत, जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲड. सावंत यांचे प्राचार्य श्री. कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या भाषणात ॲड. सावंत यांनी पुढे सांगितले की, आज प्रत्येक क्षेत्रात संघर्ष आणि स्पर्धा या दोन गोष्टी दिसून येतात. तंत्रज्ञानाने सर्व जग व्यापले आहे. शिक्षण पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. अशा काळात १० वी, १२ वी नंतर जीवनात टिकून राहायचे असेल आणि आपले मूल्य सिद्ध करायचे असेल, तर विद्यार्थीदशेतच आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ‘मला कोण व्हायचं आहे’ हे ठरवून त्या दिशेने वाटचाल सुरू करावी. जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत संशोधन आणि शोध घेत पुढे जात रहावे. तेव्हाच तुमची स्वप्ननगरी प्रत्यक्षात उतरेल आणि हीच वास्तव्याची नगरी तुमच्या गुणवत्तेची ओळख समाजाला करून देईल.

ते म्हणाले, आपले आई-वडील, शिक्षक आणि वडीलधारी माणसे हीच आपल्या वास्तव्याच्या नगरीचे खरे शिलेदार आहेत. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली विचारशक्ती विकसित करायला हवी. शालेय जीवनात तुम्ही जे लक्षपूर्वक करता, त्यावरच तुमचे स्पर्धात्मक जीवन अवलंबून असते. कोणत्याही भुलभुलय्याकडे लक्ष न देता, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकडोजी महाराज, संत नामदेव, जनाबाई यांसारख्या संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालून आपली वास्तव्याची नगरी घडवण्याचा प्रयत्न करावा. ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’ असे नको, तर मनात तुमचे ध्येय असायला हवे.

पुढे बोलताना ॲड. सावंत यांनी कृषीप्रधान देशाचा मुद्दा उपस्थित केला. ‘प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना डॉक्टर, इंजिनिअर, पायलट, किंवा शिक्षक व्हायचे आहे, पण ‘मला शेतकरी व्हायचं आहे’ असं कोणीही म्हणत नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. जेव्हा तुम्ही मायभूमीचा गौरव करून आपले ध्येय निश्चित कराल, तेव्हा तुम्ही स्पर्धात्मक युगात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्राचार्य श्री. कांबळे यांनी सांगितले की, विद्यार्थी केवळ शास्त्र शाखेत असले तरी त्यांना कला आणि इतर शाखांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठीच सामाजिक भान जपण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक श्री. खान यांनी केले.

 

 

छायाचित्र: सावंतवाडी, सांगेली नवोदय विद्यालयात बोलताना ॲड. संतोष सावंत व विद्यार्थी.