नियोजन मंडळ सभागृहातून…. संतोष वायंगणकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्ग खोल्यांचा विषय ऐरणीवर आला. १३ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र, शासनाकडुन शाळा दुरूस्तीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देऊनही जिल्ह्यातील नादुरूस्त शाळांची संख्या फारमोठी आहे. शाळा दुरूस्ती आणि शिक्षक भरतीचा विषय सर्वांच्याच जिव्हाळयाचा विषय होता. यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जी अनास्था दाखवली त्यावरून दस्तुरखुद्द पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी कडक शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलांच्या भवितव्याची तुम्हाला बिलकुल चिंता नाही. कोणतही नियोजन बांधकाम विभागाने केलं नसल्याच त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन व विकास मंडळाची बैठक पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर, आ. नितेश राणे, आ. निरंजन डावखरे, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नितीन बगाटे उपस्थित होते. आजच्या नियोजन मंडळाच्या बैठकीचा नूर काही वेगळाच होता. नियोजन मंडळाच्या बैठकित कोणतीही राजकिय गरमा-गरमी होणार नाही हे केव्हाचेच स्पष्ट झाले होते. निधीच्या विषयावरून आ. वैभव नाईक यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आ. नितेश राणे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. विद्युत विभागाच्या कारभारावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. दोन-दोन दिवस काही भागात विज गायब होते. पावसाळयात येणाऱ्या अडचणी उन्हाळी हंगामातच दूर केल्या पाहिजेत. मात्र, पावसाळयात झाडांच्या फांद्यानी विज गायब होण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. यावेळी विज वितरणचे विभागिय अभियंता श्री. पाटील यांनी विज वितरणकडून तत्काळ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील स्थिती संबंधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ज्या त्रुटी आहेत त्याची पुर्तता करण्याबाबत उपाययोजना करण्याविषयी त्यांनी सांगितले. पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी या जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी शासनस्तरावर जे करण शक्य आहे ते करूच. परंतु विविध सामाजिक संस्थाद्वारे आवश्यक असणाऱ्या उपलब्ध करण्यासाठी सामाजिक संस्थाचे सहकार्य घेतले जाईल. परंतु गोरगरीबांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हायलाच हवी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी अधिक लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या. सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आला तो महसुल यंत्रणेकडून दिले जाणारे दाखले त्यासाठी सर्वसामान्यांची केली जाणारी अडवणुक आणि सामान्यांना तहसिल कार्यालयाकडून वेठीस धरून जी लुबाडणुक सुरू आहे ते प्रथम थांबवा अशा स्पष्ट सुचना पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिल्या. एकही दाखला द्यायचा रहाता कामा नये असे सांगत पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी महसुल यंत्रणेच्या कामकाजावरच प्रश्न उपस्थित केला. समाजकल्याणमधील जातपडताळणीच्या अनेक दाखल्यांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगून ही अडवणुक केली जात आहे. आ. नितेश राणे यांनी तळेरे-वैभववाडी रस्ता त्याची झालेली दुर्दशा, घाट रस्त्याही फारच खराब झाला आहे. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दुरूस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता श्री. यादव यांनी येत्या दोन दिवसात खड्डे भरले जातील असे सांगितले. आ.वैभव नाईक यांनी पालकमंत्र्यांनी निधी आणावा असे म्हणताच मागील अडीच वर्षापेक्षा अधिकचाच निधी आला आहे असा टोला आ. नितेश राणे यांनी लगावला, तर पालकमंत्री ना. चव्हाण यांनीही आ. नाईक यांना निधीची काळजी तुम्ही करू नका तो आम्ही काहीही न बोलता, फार चर्चा न करता आणण्याचा प्रयत्न असणारच असे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन विकासासाठीचा जास्तीचा निधी आणणे यासंबंधी पालकमंत्री ना. चव्हाण यांनी नियोजन करूनच पर्यटनाचा विकास करण्यात येणार आहे. आ. नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अधिकारी गुरूवार, शुक्रवारीच गावी जातात. यामुळे याबाबत गंभिर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे आ. राणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ‘माल प्रॅक्टीस’ थांबवावी आणि कामांकडे लक्ष देण्याचे कडक शब्दात आदेश दिले. जिल्हा विकासाला गती देण्याविषयी चर्चा झाली. मात्र, या सर्वात अधिकाऱ्यांची सकारात्मकता आवश्यक ठरणार आहे.