अपना सहयोग फौंडेशन बनतोय गरीब व गरजू महिलांचा आधार- आ.शेखर निकम

१५०० हुन अधिक महिलांनी केले सक्ष्मीकारण

चिपळूण (प्रतिनिधी) : ज्यांनी ज्यांनी महिलांना सक्षमीकरण व सबलीकरण करण्याचं काम केलं त्यांचा सन्मान होणे व त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवणं अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. शहरानजिक गोवळकोट येथील मुमताज हॉल येथे अपना सहयोग फौंडेशनचे चेअरमन जरीन रूमानी आयोजित गुणगौरव सोहळ्यात आ. निकम बोलत होते.

रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह, समीर मेडिकलचे मालक नईम धामस्कर, डॉ. अल्ताफ सरगुरोह, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, वाहब सुर्वे, फिदा तस्बी, जाफर कटमाले, आयशा सरगुरोह आदी उपस्थित होते. आ. निकम पुढे म्हणाले की, गेले तीन ते चार वर्ष जरीन रुमानी महिलांसाठी सक्षमीकरण करण्याचं काम करीत आहेत. त्यांनी चार वर्षांपूर्वी छोट्याशा गाळ्यात शिलाई मशीन प्रशिक्षण सुरू केले. त्याच काळात कोरोना आल्याने अनेक अडचणी समोर आल्या. मात्र याही परिस्थितीत त्यांनी न डगमगता महिलांना सक्षमीकरण करून रोजगार उपलब्ध करून दिला. कोकणातील महिलांना टेलरिंग, नरसिंग व कॉम्प्युटर कोर्स मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षमीकरणाचे काम करीत आहेत. यापुढे त्यांना लागणारी सर्वतोपरी मदत आपण मोठा भाऊ म्हणून करू, अशी ग्वाही आ. निकम यांनी दिली.
यावेळी उर्दू पत्रकार, लेखक फिरोजा तसबी म्हणाल्या की, अपना सहयोग फाउंडेशनचे काम खूप मोठे आहे. आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा काम केले आहे. याचबरोबर त्यांनी नूरमसाला फॅक्टरी सुरू करून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जरीन रुमानी यांचा आदर्श घेऊन अनेक महिला काम करत आहेत. त्यांच्या या वाटचालीबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ.शामिना परकार बोलताना म्हणाल्या की, जरीन रूमानी या एक आदर्श व्यक्ती आहे. महिलांना सक्षमीकरण व सबलीकरण करण्याबरोबरच सामाजिक काम करत आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आरोग्य शिबिर भरवून गरीब व गरजू महिलांना मोफत औषध वाटप देखील करत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्हा बाळ संरक्षण अधिकारी स्मृती मोहिते म्हणाल्या की, महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. श्रीमती रूमानी यांना लागणारी सर्व मदत करू व महिला सक्षमीकरण करण्यासाठी सहकार्य करू अशी हमी श्रीमती मोहिते यांनी दिली.

यानंतर घरडा हॉस्पिटलच्या जनरल सर्जन डॉ. नेहा पाटील म्हणाल्या की, अपना सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिर भरवले जाते. यापुढे घरडा हॉस्पिटल चिपळूण येथे दवाखाना सुरू करून चिपळूण येथील गरजू लोकांना अल्प दरात शस्त्रक्रिया व उपचार केले जाईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जरीन रुमानी यांनी करीत अपना सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार दिले व १०० हुन अधिक प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाहिद खेरटकर यांनी मानले.