सावंतवाडी नगरपरिषदेला मिळाली शववाहिका

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनंतर कार्यवाही 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहर आणि परिसरातील नागरिकांची अंत्यविधीसाठी शववाहिकेच्या उपलब्धतेबाबत होणारी मोठी गैरसोय आता दूर होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक शववाहिका सावंतवाडी नगरपरिषदेच्या ताब्यात दिली आहे.

सावंतवाडी शहरात अंत्यविधीसाठी शववाहिकेची व्यवस्था करताना होणारी धावपळ आणि त्यासाठी लागणारा वेळ यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती, तसेच आर्थिक ताणही पडत होता. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हा परिषदेकडे असलेली शववाहिका नगरपरिषदेकडे वर्ग करण्याची सूचना केली. त्यानुसार जिल्हा परिषदेकडील ही शववाहिका आता सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

यापूर्वी, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून एक शववाहिका कॅथोलिक असोसिएशनला उपलब्ध करून देण्यात आली होती. आता नगरपरिषदेच्या ताब्यात आलेल्या या नवीन शववाहिकेमुळे सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना गरजेनुसार ही अत्यावश्यक आरोग्य सेवा अधिक जलद आणि सहज उपलब्ध होणार आहे.

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे अंत्यविधीसाठी शववाहिकेची व्यवस्था करताना होणारी नागरिकांची धावपळ कमी होईल आणि ही अत्यावश्यक आरोग्य सेवा सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून कायमस्वरूपी नागरिकांसाठी उपलब्ध राहील. या निर्णयामुळे शहरवासीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.