खेड नगरपालिकेवर पुन्हा महिलाराज! नगराध्यक्षपदासह तब्बल दहा जागा महिलांसाठी राखीव

खेड – (प्रतिनिधी)

खेड नगरपरिषदेत पुन्हा एकदा महिलाराज पाहायला मिळणार असून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण यंदा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने खेड नगरपरिषदेमध्ये महिला नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी खेड नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय आरक्षणाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार शहरातील एकूण १० प्रभागांमधील २० जागांपैकी तब्बल १० जागा महिलांसाठी आरक्षित ठरल्या आहेत. या दहा जागांमध्ये सर्वसाधारण महिला तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC महिला) या प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.

यामध्ये प्रभाग क्रमांक १, ३, ५, ६, ७, ८ आणि १० या प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले असून, प्रभाग क्रमांक २, ४ आणि ९ या प्रभागांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC महिला) या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. परिणामी, नगराध्यक्ष पदासह जवळपास अर्ध्याहून अधिक जागांवर महिलांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे.

या पूर्वीही खेड नगरपालिकेच्या नेतृत्वाची धुरा महिलांनी यशस्वीपणे सांभाळली असून, शहराच्या विकासात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. आता पुन्हा एकदा महिला उमेदवारांना नेतृत्वाची संधी मिळाल्याने, त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाची दिशा अधिक गतिमान आणि प्रगतिशील होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना समान प्रतिनिधित्व मिळावे, या हेतूने करण्यात आलेल्या आरक्षणामुळे खेड नगरपरिषदेतील राजकारणात महिलांचे सशक्तीकरण अधिक दृढ होणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महिला उमेदवारांच्या कार्यकुशलतेचा आणि नेतृत्वगुणांचा नवा अध्याय खेड शहरात लिहिला जाईल, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.