शस्त्र परवाना देताना पोलिस अहवालावरच निर्णय – गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे स्पष्टीकरण

खेड – (प्रतिनिधी)

शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना देण्यात आलेल्या प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चांवर गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शस्त्र परवाना देताना पोलिस विभागाच्या अहवालानुसार आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारेच निर्णय घेण्यात आला आहे.


गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. त्यामुळेच नियमानुसार त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला.
कदम पुढे म्हणाले की, उपलब्ध कागदपत्रे तसेच  न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशाचे अवलोकन करून सर्व कार्यवाही कायदेशीर मार्गानेच करण्यात आली आहे.
त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी या अपीलासंदर्भातील कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले की, चुकीच्या बातम्या आणि गैरसमजांवर विश्वास ठेवू नये. या स्पष्टीकरणामुळे सचिन घायवळ यांच्या शस्त्र परवाना प्रकरणातील गैरसमज दूर झाले असून, राज्यमंत्री कदम यांनी पारदर्शकतेने व कायदेशीर प्रक्रियेनुसारच निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.